राज्यात एमएचटी-सीईटी सुरळीत पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 03:26 AM2017-05-12T03:26:51+5:302017-05-12T03:26:51+5:30
राज्य शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा (एमएचटी-साीईटी) गुरुवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९६ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.
राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये व परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त होता. प्रत्येक परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू केल्याने केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स, फोन व इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. परीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील गणित विषयास नोंदणी केलेल्या २ लाख ९३ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८३ हजार ८५४ विद्यार्थी हजर होते. तर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७६ हजार २८२ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. जीवशास्त्र विषयाला सर्वाधिक म्हणजेच २ लाख ४४ हजार ७०८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ३७ हजार ३४९ म्हणजेच ९६.९९ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, अशी माहिती सीईटी सेलने दिली.
परीक्षेचा निकाल ४ जून २०१७ रोजी लागेल. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाईल. उत्तरसूची जाहीर करणे, उमेदवारांना त्यांच्या लॉगइनमधून त्यांच्या स्कॅन उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करून देणे, उत्तरसूची व प्रश्नांना आक्षेप मागवणे आदींचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केल्याचेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही केले आहे.