राज्यात एटीएम पुन्हा कॅशलेस

By admin | Published: May 10, 2017 01:59 AM2017-05-10T01:59:35+5:302017-05-10T01:59:35+5:30

रिझर्व्ह बँकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करुन दिली जात नसल्याने राज्यात मुंबईबाहेर बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम कॅशलेश झाले आहेत.

State ATMs cashless again | राज्यात एटीएम पुन्हा कॅशलेस

राज्यात एटीएम पुन्हा कॅशलेस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करुन दिली जात नसल्याने राज्यात मुंबईबाहेर बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम कॅशलेश झाले आहेत. त्यामुळे महानगरे व निमशहरे व ग्रामीण भागात लोकांना रोकडअभावी व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत पगाराचे दिवस असल्याने खात्यात पैसे असूनही ते हातात मिळत नसल्याने पुन्हा चलन टंचाई निर्माण झाली आहे.
‘लोकमत’ने संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर मराठवाडा, विदर्भ, खान्देश,
सोलापूर, कोल्हापूर भागात एटीएम पुन्हा कोरडे पडले असल्याचे आढळले. विशेष म्हणजे बँक आॅफ महाराष्ट्रच्या नाशिक विभागीय व्यवस्थापकांनी रिझर्व्ह बँके कडे मागणी करूनही नवीन नोटांचा पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये रोकड जमा करण्यात अडचणी येत असल्याची कबुली दिली.
विदर्भात लोकांचे हाल
विदर्भात गडचिरोली वगळता बहुतांश शहरांमध्ये सर्वच बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट दिसून आला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील एटीएममध्ये जवळपास महिन्यापासून रोकडच नसल्याने लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
एटीएमबाहेर रांगा असल्याचे चित्र यवतमाळमध्ये दिसले. अमरावती जिल्ह्यातील २०० च्या वर एटीएम कॅशलेस असल्याचे आढळून आले. अमरावती जिल्ह्यातील २०० च्या वर एटीएममध्ये ठणठणाट आहे. वर्धा जिल्ह्यातही तशीच स्थिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ९० टक्के एटीएम रिकामे झाले आहेत. अपवाद फक्त नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश सर्व बँकांचे एटीएम पैशांनी भरून असल्याचे मंगळवारी दिसून आले. राष्ट्रीयकृत बँकांसह गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०० वर एटीएममधून सुरळीतपणे पैसे मिळत असल्याचे दिसून आले. यवतमाळातील १९८ पैकी १५४ एटीएममध्ये पैसे नाहीत.
मराठवाड्यात चलनकल्लोळ-
मराठवाड्यात रिझर्व्ह बँकेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एटीएममध्ये खडखडाट आहे. लातूरला एक-दोन एटीएम वगळता सर्वच एटीएमचे ‘शटर डाऊन’ आहेत. बीडमध्ये ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत. सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचे वाटप रखडले आहेत. औरंगाबाद शहरासाठी पगारी आठवड्यात सोमवारी अवघे ७९ कोटी रुपयेच बँकांना पाठविण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात महिनाभरापासून बहुतांश एटीएम केंद्रात खडखडाट असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे़ परभणी जिल्ह्यात दररोज २५ कोटींची रोकड तूट जाणवत आहे. सद्यस्थितीमध्ये केवळ २५ कोटी रुपयेच उपलब्ध होत आहेत.
खान्देशात ठणठणाट-
खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचा चलनपुरवठा कमी झाल्याने एटीएम बंदचे संकट ओढवले आहे. जळगावात ६८ एटीएमपैकी फक्त ४५ कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १०५ राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांकडे आठवडाभर पुरेल एवढीच रोख रक्कम आहे़ जिल्ह्यातील ६० पैकी निम्मे एटीएम पैशांविना बंद आहेत़
पुणे, सोलापूर, नाशिक, नगरला धावाधाव-
पुण्यातही एटीएममध्ये खडखडाटच आहे. सोलापूरमध्ये १,२४१ पैकी बरीचशी एटीएम बंद आहेत. नाशिकमध्ये ५० टक्क्यांहून अधिक एटीएम रिकामे आहेत. अहमदनगरमधील एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नगरमधील सर्वच बँकांमध्ये ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जात आहे.
रिझर्व्ह बँके कडून मागणी करूनही नवीन नोटांचा पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये रोकड जमा करण्यात अडचणी येत आहेत. बँकेत १०, २० व ५० रुपयांच्या चलनाची शिल्लक आहे. ती एटीएममध्ये टाकता येत नाही. नोटाबंदीनंतर बँकेत पैसे भरण्याचे प्रमाण कमी झाले असून नवीन चलन पुरवठा होत नसल्याने अशा समस्या उद्भवू लागल्या आहेत.
- आर. एम. पाटील, विभागीय व्यवस्थापक,
बँक आॅफ महाराष्ट्र

Web Title: State ATMs cashless again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.