प्रदेश भाजपाचा कारभार तुटलेल्या कार्यालयातूनच
By admin | Published: January 15, 2017 03:22 AM2017-01-15T03:22:42+5:302017-01-15T03:23:41+5:30
राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच, भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश मुख्यालयाला
मुंबई : राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच, भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश मुख्यालयाला मात्र सध्या अवकळा आली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त कार्यालय न्यायालयाच्या आदेशानुसार पाडले आहे. उरलेल्या भागात प्रदेश मुख्यालय कसेबसे तग धरून आहे.
कार्यालयाचा दर्शनी भाग पूर्वीसारखाच असला तरी मागचे सगळे बांधकाम पाडण्यात आले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे सांगत नरिमन पॉइंट रहिवासी संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ते पाडण्याची मागणी केली होती. भाजपा कार्यालयाच्या मूळ जागेव्यतिरिक्तची ३० मीटरची जागा अवैधरीत्या कब्जात घेऊन हे बांधकाम करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. ते न्यायालयाने ग्राह्य धरले आणि भाजपाने हे अवैध बांधकाम पाडावे, असे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करीत महापालिकेकडून कारवाई होण्याच्या आत स्वत: भाजपानेच ते बांधकाम पाडले. त्यामुळे सध्या राज्यात नंबर वनवर असलेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे ‘बुरे हाल’ आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी हे कार्यालय आलिशान बांधण्यात आले होते. शंभरएक लोक बसू शकतील, असे छोटेखानी एसी सभागृह होते. पूर्वी वरच्या माळ्यावर गुप्त बैठकी चालायच्या. लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यालयाची मात्र रया गेली आहे. कार्यालयातील
एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने
सांगितले की, आम्ही दक्षिण मुंबईतच मोठ्या कार्यालयासाठी जागा शोधत आहोत. दोन-तीन जागाही निवडलेल्या आहेत, पण कुठल्या एका जागेचे अद्याप नक्की झालेले नाही. (विशेष प्रतिनिधी)