राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ‘हवा’च!
By admin | Published: April 21, 2017 04:02 AM2017-04-21T04:02:35+5:302017-04-21T04:02:35+5:30
भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. तीत मंत्रिमंडळात फेरबदलाबाबतचा कोणताही विषय आला नाही
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. तीत मंत्रिमंडळात फेरबदलाबाबतचा कोणताही विषय आला नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, तशी चर्चा दिवसभर होती.
मंत्रिमंडळातून भाजपाचे कोणते मंत्री गाळणार आणि नव्याने कोणाला घेणार यावरही चॅनेल्समधून चर्चा सुरू झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आजच्या बैठकीत फेरबदलाचा कोणताही विषय नव्हता. भुवनेश्वरमध्ये अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी प्रत्येक प्रदेश कार्यकारिणीची बैठक गांभीर्याने झाली पाहिजे आणि त्यात पक्षसंघटना गतिमान करण्यासाठी सखोल चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह धरला होता. त्या पार्श्वभूमीवर आजच्या कोअर कमिटीमध्ये पिंपरी-चिंचवडच्या बैठकीचा अजेंडा ठरविण्यात आला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही तरी त्याच्या बातम्या कशा आल्या याचे आश्चर्य वाटल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
सूत्रांनी सांगितले की भाजपाच्या कार्यपद्धतीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा कोअर कमिटीमध्ये कधीही होत नसते. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी निगडित हा विषय आहे. फेरबदलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची परवानगी मुख्यमंत्री घेतात. तशी कोणतीही परवानगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप घेतलेली नाही.
फेरबदल होणार की नाही हे निश्चित नसले तरी आजच्या भाजपा कोअर कमिटीत हा विषय नव्हता, असे समितीचे सदस्य असलेल्या अन्य एका मंत्र्यांनी लोकमतला सांगितले.