राज्य, केंद्राचा कारभार संवेदनशून्य : महाडिक
By admin | Published: April 22, 2017 01:17 AM2017-04-22T01:17:20+5:302017-04-22T01:17:20+5:30
संघर्ष यात्रा तयारी बैठक : कर्जमाफी झाली नाही तर राज्यातील बँका बुडतील : मुश्रीफ
कोल्हापूर : कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत का? याची खात्री विरोधक देणार का? असे संवेदनशून्य प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. राज्य व केंद्र सरकारचा कारभार हा संवेदनशून्य असून साखर उद्योगाला अडचणीत आणणारेच धोरण ते राबवत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे नेते संघर्षयात्रेसाठी कोल्हापूरात येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. देशात ४७ लाख टन साखर शिल्लक असतानाही कच्ची साखर आयात विनाशुल्क केली. केंद्र सरकारचे या मागील गौडबंगाल तरी काय? हेच समजत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या झटक्यात कर्जमाफी केली, पण देवेंद्र फडणवीस यांना अशी सुबुद्धी का सूचत नाही, असा सवाल करत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कर्जमाफी झाली नाहीतर बँका बुडतील. माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तर ‘हुतात्मा’ सूतगिरणीला ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल के. पी. पाटील व पंडितराव केणे यांचा सत्कार करण्यात आला. महापौर हसीना फरास, आ. संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, युवराज पाटील, भैया माने, सर्जेराव पाटील-गवशीकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मधुकर जांभळे, संगीता खाडे आदी उपस्थित होते.
पासवानना समजते का ?
साखर उद्योगातील धोरणाबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतल्यानंतर ऊस न लावता पाम लावण्याचा सल्ला दिला. उसाबाबत एकूण केंद्र सरकार नकारात्मक भूमिकेत असून पासवान यांना शेतीतील समजते का, अशी शंका येते असे महाडिक यांनी सांगितले.
चंद्रकांतदादांचे आभार
कर्जमाफीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सकारात्मक असल्याबद्दल त्यांचे आभार, पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकर निर्णय घ्यावा. शेतकरी डोळे लावून कर्जमाफीकडे बसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘गणदेवी’ दराच्या अभ्यासासाठी समिती
गुजरात येथील गणदेवी साखर कारखान्याने पाच हजार रुपये प्रतिटन दर दिला आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, तज्ज्ञ शेतकरी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींची समिती तयार करणार आहे, त्यांच्याकडून विस्तृत अहवाल तयार करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.