राज्य गुदमरतेय! प्रदूषणांच्या जाळ्यात , मुंबई लागोपाठ नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:59 AM2018-05-04T05:59:21+5:302018-05-04T05:59:21+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषित शहराचा अहवाल सादर केला आहे.
कुलदीप घायवट
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषित शहराचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात जगातील वाढत्या प्रदूषणांमध्ये दिल्लीचा प्रथम क्रमांक असून दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. त्यामुळे मुंबईची दिल्लीसारखी अवस्था होण्याची वेळ आली आहे. राज्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, बांधकामाची ठिकाणे, विकासात्मक कामे यामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. राज्यातील पॉर्टीक्युलेट मॅटरची (पीएम) आकडेवारी वाढत असताना दिसून येत आहे. गुरुवारी केलेल्या सर्वेक्षणानुसार पीएम आकडेवारी- नाशिक ११८ पीएम, औरंगाबाद ९२ पीएम, पुणे ७८ पीएम, नागपूर ७० पीएम आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी एकमेव उपाय म्हणून झाडेच लावण्याची आवश्यकता आहे. तसेच जी झाडे आहेत त्यांना वाचवणे गरजेचे आहे. सार्वजनिक सुविधा म्हणून बसचा वापर केला जावा. सरकार झाडे लावण्याच्या जाहिराती करत आहे. ते फक्त झाडे लावण्याच्या जाहिरातीपुरते मर्यादित राहावे तसेच सरकारने विकास करताना पर्यावरणाचादेखील विचार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले की, राज्यातील वाढत्या प्रदूषणाला वाढणाऱ्या चारचाकी गाड्यांची संख्या कारणीभूत आहे. मुंबईमध्ये ३७ लाख गाड्या दररोज धावत आहेत. यात रोज ५०० गाड्यांची भर पडतेय. यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. एका मोटार गाडीतून १ हजार संयुगे बाहेर पडतात. मुंबईतील खरी सार्वजनिक वाहतूक म्हणजे बेस्ट, पण या बेस्ट बसचा ताफा कमी करण्यात आला आहे. चार टक्के जागा व्यापणारी बस ६१ टक्के लोकांना सेवा देत आहे. तर कार मात्र ८४ टक्के जागा व्यापून ७ टक्के लोकांना सेवा देत आहे. यामुळे मुंबईतील वाहतूककोंडी, वायुप्रदूषण वाढत आहे. सरकारने सार्वजनिक वाहतूक म्हणून मेट्रो, मोनो सेवा आणली. मात्र ही सेवा महाग, क्षमता नसणारी, सर्वत्र पोहोचणारी नाही. या सेवा देण्यापेक्षा बसची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून आजतागायत झाले नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती मुंबईत तरी बदलणे कदापि शक्य नाही. - डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्तीप्रदुषणाचा हेरिटेज वास्तूंना धोका आहे. वास्तूवर पोपडी तयार होऊन वास्तूचा खरा रंग उडत आहे. हेरिटेज वास्तूंवर काळे डाग पडत आहेत.
चेतन रायकर, सदस्य, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीभारतीय मानकांनुसार पीएम १०चे वार्षिक मानक सरासरी ६० मायक्रॉन घनमीटर आणि पीएम २.५चे वार्षिक मानक सरासरी ४० मायक्रॉन घनमीटर आहे.
- डॉ. वि.मो. मोटघरे, सहसंचालक, प्रदूषण महामंडळ