राज्य सहकारी बँकेला ६०९ कोटींचा निव्वळ नफा; कर्ज वितरणात ४९० कोटी रुपयांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 08:01 AM2023-05-05T08:01:18+5:302023-05-05T08:01:54+5:30
बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सरत्या आर्थिक वर्षामध्ये अनेक पातळ्यांवर बँकेची कामगिरी उत्तम राहिली आहे.
मुंबई - नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये दि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटिव्ह बँकेने ६०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला ६०३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, त्यात राज्य शासनाकडून थकहमीपोटी मिळालेल्या रकमेचा समावेश होता. मात्र, यंदा बँकेला मिळालेला नफा हा निव्वळ नफा असून यामध्ये राज्य शासनाकडून थकहमीपोटी मिळालेल्या रकमेचा समावेश नाही.
बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सरत्या आर्थिक वर्षामध्ये अनेक पातळ्यांवर बँकेची कामगिरी उत्तम राहिली आहे. यामध्ये बँकेचे नक्त मूल्य ३८१७ कोटी रुपये झाले असून गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ५९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. देशातील सर्व सहकारी बँकांच्या तुलनेत राज्य बँकेचे नक्त मूल्य आजच्या घडीला जास्त आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार बँकांना भांडवल पर्याप्तता प्रमाण अर्थात सी.आर.ए.आर. हे ९ टक्के राखणे आवश्यक आहे. राज्य बँकेने हे प्रमाण १७.७६ राखल्यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे.
३१ मार्च २०२३ पर्यंत बँकेने एकूण २६ हजार ४५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून त्या आधीच्या वर्षाच्या कर्ज वितरणाच्या तुलनेत यंदाचा कर्ज वितरणाचा आकडा हा ४९० कोटी रुपयांनी अधिक आहे तसेच, बँकेने आपला प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो ९७ टक्के इतका ठेवल्याने अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण ०.४५ टक्के इतके कमी झाल्याचे बँकेने कळवले आहे. - विद्याधर अनास्कर, प्रशासक, दि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटिव्ह बँक