राज्य सहकारी बँक इथेनॉल निर्मितीसाठी करणार पतपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 07:22 PM2019-09-04T19:22:13+5:302019-09-04T19:22:35+5:30
साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे...
पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँक देखील साखर कारखान्यांना यंत्रसामग्रीमधे बदल करण्यासाठी पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने सी मोलॅसिस (मळी), बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची या पुर्वीच परवानगी दिली आहे. देशात तब्बल १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. आगामी हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटक वगळता देशात चांगले साखर उत्पादन होईल. त्यामुळे पुढील वर्षी देखील साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
राज्य सहकारी बँकेने जुलै २०१९मध्ये साखर परिषद घेतली होती. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी कृषी मंत्री शरद पवार उपस्थित होते. साखरेपासून इथेनॉल निर्मिती, अंशत: इथेनॉल आणि अंशत: साखर निर्मिती, इथेनॉलच्या किंमतीत वाढ आणि वाहतूक अनुदान देण्याच्या मागणीचा प्रस्ताव राज्य बँकेने केंद्र सरकारला दिला होता. गडकरी यांनी त्याबाबत पुढाकार घेऊन केंद्रीय कृषी आणि पेट्रोलियम मंत्र्यांबरोर बैठक घडवून आणली होती. त्या प्रमाणे केंद्र सरकारने इथेनॉलबाबत निर्णय घेतला असल्याचे दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांना त्यांच्या यंत्रामधे आवश्यक सुधारणा करण्यासाठी जो काही खर्च लागेल, तो राज्य बँक कर्ज रुपाने देण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येईल, असेही अनास्कर यांनी स्पष्ट केले.