शुल्कवाढ प्रकरणाला राजकीय रंग
By admin | Published: June 4, 2017 12:07 AM2017-06-04T00:07:51+5:302017-06-04T00:07:51+5:30
मुंबईसह राज्यात पेटलेल्या शुल्कवाढीच्या प्रश्नाला आता राजकीय रंग चढू लागले आहेत. खासगी शाळांमध्ये होणाऱ्या वारेमाप शुल्कवाढीला आळा घालण्यासाठी पालकांनी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यात पेटलेल्या शुल्कवाढीच्या प्रश्नाला आता राजकीय रंग चढू लागले आहेत. खासगी शाळांमध्ये होणाऱ्या वारेमाप शुल्कवाढीला आळा घालण्यासाठी पालकांनी उभ्या केलेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी सहभागी होताना दिसत आहेत. दहिसर येथील युनिव्हर्सल हाय शाळेतील पालकांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनीही राज्यपालांना मनमानी शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली.
एप्रिल महिन्यापासून मुंबई-पुणे शहरात पालकांनी एकत्र येऊन शुल्कवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे. शाळेची शुल्कवाढ दरवर्षी करण्यात येते. त्यामुळे आता शाळांचे शुल्क हे लाखोंच्या घरात पोहोचले आहे. प्रत्येक पालकाला हे शुल्क परवडते असे नाही. दोन मुले शिकत असल्यास पालकांवर अधिक बोजा पडतो. त्यामुळे पालकांनी सुरू केलेल्या आंदोलनात राजकीय पक्ष सहभागी होताना दिसत आहेत. राज्यपालांच्या भेटीदरम्यान पालकांनी शुल्कवाढीबाबत शाळेविरोधात पाढा वाचून दाखवला. राज्यपालांना शुल्कवाढीविरोधात एक निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील शाळांच्या शुल्क नियंत्रणासाठी कायदा अस्तित्वात आहे. पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. कायद्यानुसार, शाळा प्रत्येक वर्षी शुल्कवाढ करू शकत नाही. तरीही कायद्याचे उल्लंघन करून शाळांमध्ये १५ टक्क्यांनी शुल्कवाढ करण्यात येते. पालकांचे होत असणारे आर्थिक शोषण थांबावे यासाठी राज्यपालांची भेट घेतली, असे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले. राज्यपालांनी यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
दहिसर येथील युनिव्हर्सल हाय शाळेतील शुल्कवाढीप्रकरणी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तर शिक्षण शुल्क समितीपुढे झालेल्या सुनावणीत भाजपा नगरसेवकदेखील पोहोचले होते.