Sambhaji Bhide Controversy: संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! महिला आयोगाची दुसरी नोटीस; उत्तर देण्यास दोन दिवसांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 11:12 AM2022-11-08T11:12:28+5:302022-11-08T11:12:40+5:30
Sambhaji Bhide Controversy: विहीत मुदतीत बाजू न मांडल्यास याप्रकरणी एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे महिला आयोगाने नोटिशीत स्पष्ट केले आहे.
Sambhaji Bhide Controversy: वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या संभाजी भिडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे संभाजी भिडे यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. या प्रकरणाची दखल राज्याच्या महिला आयोगाने घेत संभाजी भिडे यांना नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिसीला उत्तर देण्यात आलेले नाही. यामुळे महिला आयोगाने दुसऱ्यांना नोटीस बजावली असून, उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांना एका खासगी वाहिनीच्या महिला पत्रकाराने विचारणा केली असता, ‘प्रत्येक स्त्री भारतमातेचे रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया भिडे यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. सर्वसामान्य महिलेपासून ते महिला राजकारणी नेत्यांपर्यंत संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या.
बाजू न मांडल्यास याप्रकरणी एकतर्फी निर्णय
राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत त्यांनी नोटीस बजावली. या नोटिशीला भिडे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दुसरी नोटीस बजावली. दिलेल्या मुदतीत त्यांनी आपली बाजू न मांडल्यास याप्रकरणी एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे महिला आयोगातर्फे या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले.
महिला आयोगाने नोटिशीत नेमकं काय म्हटलंय?
महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही, म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडे यांनी आपल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, अशी नोटीस आयोगाकडून २ नोव्हेंबर रोजी बजावण्यात आली होती. यावर अद्याप खुलासा न आल्याने त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीला विहीत मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"