महाविद्यालयीन परीक्षेबाबत राज्य समिती करणार सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 07:50 PM2020-05-02T19:50:15+5:302020-05-02T19:50:54+5:30
त्यानंतरच समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार
पुणे: राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबतचा अहवाल देण्यासाठी राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीतील सदस्य आता राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्यापरीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी राज्यपाल व उच्च शिक्षण मंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समितीचे स्थापन करण्यात आली.
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने सुद्धा शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्यासाठी व परीक्षांबाबत निर्देश देण्यासाठी समितीची स्थापना केली होती. त्यामुळे यूजीसीकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतरच राज्याच्या समितीने काम करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी केंद्र शासन व यूजीसीकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार 1 मे रोजी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीची बैठक घेण्यात आली. त्यात राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी संवाद साधून अहवाल तयार करण्याचा निर्णय झाला.
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यात एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने कुलगुरूंची चर्चा करणे योग्य ठरेल. त्यामुळे समितीतील प्रत्येक सदस्याने दोन किंवा तीन कुलगुरूंची चर्चा करावी, असे या बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार समितीतील सर्व सदस्य कुलगुरूंची चर्चा करून अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. त्यानंतरच राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार याबाबत स्पष्टता येणार आहे,असे सुत्रांनी सांगितले.