2017-18चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 06:53 PM2018-01-22T18:53:55+5:302018-01-22T18:54:40+5:30
नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन व कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना सन 2017-18 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई - नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन व कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना सन 2017-18 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सन 2017-18 या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त मान्यवर कलाकारांची नावे आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषित केली आहेत.
सन 2017-18 या वर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार अनेकांनी पटकावले आहेत. सेवा चव्हाण (नाटक), पं. शांताराम चित्ररी गुरुजी (कंठसंगीत), कल्याणी देशमुख (उपशास्त्रीय संगीत), सरोज सुखटणकर (मराठी चित्रपट), नरहरी अपामार्जने (कीर्तन), श्रीमती झरीना बेगम युसूफ सय्यद (तमाशा), शाहीर शिवाजीराव पाटील (शाहिरी), दीपक मुजूमदार (नृत्य), भिकाजी तांबे (लोककला), ओल्या रुपा पाडवी (आदिवासी गिरीजन) आणि माऊली टाकळकर (कलादान) यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे स्वरुप रुपये 1 लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे आहे.