राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकास लाच स्वीकारताना अटक

By admin | Published: February 18, 2015 01:20 AM2015-02-18T01:20:00+5:302015-02-18T01:20:00+5:30

मलकापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई

State Excise Duty Supervisor arrested for accepting bribe | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकास लाच स्वीकारताना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकास लाच स्वीकारताना अटक

Next

खामगाव (जि. बुलडाणा) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकास १ लाखाची लाच स्वीकारताना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मलकापूर येथे अटक केली.
मलकापुरनजीक बहापूरा शिवारात असलेल्या बीयु फ्रेश या शुध्द पाणी प्रकल्पाचे टर्नओव्हर जास्त असल्याचे सांगुन खामगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अनिल उमाजी छप्परगे (वय ५0) यांनी २५ लाखाची मागणी बी.यु. फ्रेश प्रकल्पाचे भागीदार सचिन नांदुरकर रा. नांदुरा यांच्याकडे केली होती. मात्र प्रकल्प ग्रामीण भागात असल्याने व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कर भरण्याची गरज नसल्याचे सचिन नांदुरकर यांनी अधीक्षक छप्परगे यांना सांगितले होते. पैसे देत नसाल तर फॅक्टरी सील करू, बंद करू अशी धमकी त्यांना देण्यात येत होती. तसेच या फॅक्टरीची कागदपत्रे सुध्दा छप्परगे यांनी जप्त केली होती. त्यानंतरही पैसे देण्याबाबत छप्परगे यांच्याकडून तगादा लावण्यात येत होता. यानंतर तडजोडीअखेर ५ लाख रूपये टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते. याबाबत सचिन नांदुरकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार आज नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक गुप्ता व त्यांचे सहकारी मलकापूर येथे दाखल झाले होते.
छप्परगे यांनी १ लाखाची रक्कम पाण्याच्या बॉक्समध्ये ठेवून माझ्या गाडीत ठेवावी, असे सचिन नांदुरकर यांना सांगितले. त्यानुसार सचिन नांदुरकर हे १ लाखाची रक्कम छप्परगे यांच्या गाडीत ठेवण्यासाठी नेत असताना दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल उमाजी छप्परगे यांना अटक केली. याप्रकरणी मलकापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येवून छप्परगे यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: State Excise Duty Supervisor arrested for accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.