राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलात २० टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:45 AM2018-09-26T06:45:15+5:302018-09-26T06:45:40+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या ५ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या एकूण महसुलामध्ये वाढ झालेली असताना नागपूर विभागात मात्र तब्बल २९ टक्क्यांची घट झाली आहे.
- खलील गिरकर
/>मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या ५ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या एकूण महसुलामध्ये वाढ झालेली असताना नागपूर विभागात मात्र तब्बल २९ टक्क्यांची घट झाली आहे. तसेच, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही घट झाली आहे. मुंबई शहरात १०.७२ टक्क्यांची तर, उपनगरात २९.२६ टक्क्यांची घट झाली आहे.
२०१८-१९ या वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ हजार ३४३ कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट समोर ठेवले असून या कालावधीत ५ हजार ५०१ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात विभागाला यश आले आहे. गतवर्षी या कालावधीत ४ हजार ५९९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता झालेली ही वाढ १९.६१ टक्के इतकी आहे. नियोजित उद्दिष्टाच्या एकूण ३५.८६ टक्के महसूल जमा करण्यात विभागाला यश आले आहे.
कोल्हापूर विभागाचे उद्दिष्ट १,२९० कोटी रुपये एवढे असताना आतापर्यंत या विभागाकडून ४५७ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ २२.४४ % आहे.
औरंगाबाद विभागाचे उद्दिष्ट ४,८२४ कोटी असून आतापर्यंत १८९२ कोटींचा महसूल जमा झाला आहे. ही वाढ १८.५२ % इतकी आहे. ठाणे विभागाचे उद्दिष्ट २,६९९ कोटी असून आतापर्यंत ८१६ कोटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही १६.६० % वाढ आहे. तर नागपूर विभागाचे उद्दिष्ट ८८२ कोटी असून आतापर्यंत केवळ १८६ कोटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये २९.५८ टक्क्यांची घट झाली आहे.
राज्यात नाशिकमध्ये सर्वांत जास्त महसूल
महसूल प्राप्तीत राज्यात सर्वांत जास्त महसूल वाढ नाशिकमध्ये झाली आहे. नाशिक विभागाला २२०८ कोटींचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ९६७ कोटींचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ४९.८१ %आहे.
सर्वाधिक वाढ झालेले जिल्हे : भंडारा-२९७ %, उस्मानाबाद-१३८.२९ %, वाशिम-१३० %, धुळे-१२८ %, हिंगोली-१००.८९ %,
घट झालेले जिल्हे : बुलडाणा- ८६.९६ %, सांगली-४३.५९ %, परभणी-४२.४२ %, नागपूर-३४.८८ %, ठाणे-३४.२३ %, मुंबई उपनगर-२९.२६ %