फटाक्यांच्या बंदीवरून राजकीय आतषबाजी; शिवसेना, मनसेचा विरोध : रामदास कदम यांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:04 AM2017-10-11T05:04:43+5:302017-10-11T05:05:06+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रातही अशी बंदी आणण्यावरून राजकीय आतषबाजी सुरू झाली आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रातही अशी बंदी आणण्यावरून राजकीय आतषबाजी सुरू झाली आहे. प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे वक्तव्य पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी फटाकेबंदीविरोधातच फटाका लावला.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निवासी भागात फटाके विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले. मात्र त्या वृत्ताची कोणतीही खातरजमा न करता राजकीय आतषबाजीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरण विभागाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरुवात केली. सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणासाठी कुठेही पर्यावरणाचा ºहास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तर यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहन करत फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच पर्यावरणमंत्री कदम यांनी केले.
फटाकेमुक्त दिवाळीची चर्चा सुरू होताच शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला. फटाक्यांवर कसल्याही प्रकारची बंदी
सहन करणार नसल्याचा इशारा खा. संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले, असंख्य मराठी मुले फटाक्यांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करीत आहेत. शिवसेना शाखांनी त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यावर पोटावर का मारता, असा सवाल राऊत यांनी केला.