रिओ ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक व महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा राज्य सरकार करणार सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 06:02 PM2017-09-27T18:02:38+5:302017-09-27T18:05:21+5:30
रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने
मुंबई - रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ उद्या 28 सप्टेंबर, 2017 रोजी सह्यादी अतिथीगृह येथे दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
रिओ ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपट्टू साक्षी मलीक(हरियाणा) मार्गदर्शक कुलदिप सिंग, ॲथलेटिक्स ललीता बाबर, मार्गदर्शक भास्कर भोसले, रोईंगपट्टू दत्तू भोकनळ, हॉकीपट्टू देविंदर सुनिल वाल्मिकी, मॅराथॉनपट्टू कविता राऊत, नेमबाजीपट्टू आयोनिका पॉल, लॉन टेनिसपट्टू प्रार्थना ठोंबरे यांचा उद्या सत्कार होणार आहे. तसेच रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू उंचउडी- मरिय्यप्पन थंगावेलू, मार्गदर्शक सत्यनारायण, भालाफेक- देवेंद्र झाझरिया, राजस्थान, मार्गदर्शक सुनिल तंवर, गोळाफेक - दिपा मलीक, हरियाणा, मार्गदर्शक वैभव सरोही, उंचउडी - वरुन भाटी, नोयडा, मार्गदर्शक सत्यनारायण, जलतरण - सुयश जाधव यांचाही रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ उपविजेते ठरले. या संघामध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेटपट्टू असलेल्या मोना मेश्राम, पुनम राऊत, स्मृती मानधना, संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य, फिजोओ थेरेपिस्ट रश्मी पवार यांचाही उद्या सन्मान केला जाणार आहे.