कोकणातील अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाची अखेर १९ कोटी ३८ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:25 AM2019-11-01T02:25:32+5:302019-11-01T02:25:42+5:30

ठाण्याचा वाटा सव्वाअकरा कोटींचा ; छोटे व्यापारी, टपरीधारकांना लाभ

State Government finally provides Rs. 90.7 million assistance to Konkan over-flooding | कोकणातील अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाची अखेर १९ कोटी ३८ लाखांची मदत

कोकणातील अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाची अखेर १९ कोटी ३८ लाखांची मदत

Next

नारायण जाधव 

ठाणे : राज्यात जुलै ते ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांसह अनेक शहरे, गावांतील छोटे व्यापारी, हस्तकला कारागिर, टपरीधारकांसह बारा बलुतेदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांचे पशुधनासह गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. यात कोकणातील ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतही मोठी हानी झालेली आहे. यानुसार कोकण आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार १९ कोटी ३७ लाख ३२ हजार ३२० रुपयांची मदत महसूल व पुनर्वसन विभागाने गेल्या आठवड्यात वितरीत केली आहे. यात सर्वात मोठा हिस्सा ठाणे जिल्ह्याचा आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली होती. शहरांमध्ये अनेक घरे, चाळी, दुकानांत पाणी शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय शेतीसह शेतकºयांच्या पशुधनासह त्यांच्या गोठ्यांचीही पडझड झाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीच्या १९ आॅगस्ट २०१९ च्या बैठकीत छोटे उद्योग, गॅरेजचालक, हस्तकला कारागिर, टपरीधारक, घरांच्या पडझडीस गोठ्यांच्या नुकसानीकरिताही मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही १९ कोटी ३७ लाख ३२ हजार ३२० रुपयांची मदत गेल्या आठवड्यात वितरीत करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाकडून ही मदत करण्यात येत असल्याचे महसूल व पुनर्वसन विभागाने म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक मदत
कोकणात सर्वात जास्त नुकसान ठाणे जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका,दोन नगरपालिकांच्या क्षेत्रासह ग्रामीण भागातही या काळात मोठे नुकसान झाले होते. ठाणे शहरातील दिवा विभाग,अंबरनाथ-बदलापूर शहरासह ग्रामीण परिसर, उल्हासनगर, कल्याण तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली होती. तसेच शहापूर, मुरबाड, भिवंडीतही काही भागात पुराच्या पाण्यातून काढण्यासाठी एनडीआरएफस नौदल आणि हवाईदलाची मदत घेऊन स्थानिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने नजिकच्या शाळा तसेच हवाईदलाच्या तळावर त्यांची तात्पुरती सोय केली होती. तसेच ग्रामीण भागात गोठ्यांचेही मोठी पडझड झाली होती. यामुळेच ठाणे जिल्ह्याचा या मदतीत ११ कोटी २५ लाख ६८ हजार इतका मोठा वाटा मिळाला आहे.

अतिवृष्टी, पुरग्रस्त भागाची पाहणी
केंद्र शासनाच्या पथकानेही दोन दिवस फिरून ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करून आणि त्या त्या जिल्हाधिकाºयांचे सादरीकरण ऐकून घेतले होते. केंद्राची मदत येण्याआधीच राज्य शासनाने ही मदत वितरीत केली आहे.

जिल्हानिहाय अशी मिळणार मदत
ठाणे ११ कोटी २५ लाख ६८ हजार
पालघर १६ हजार ८००
रायगड दोन कोटी ९७ लाख ३१ हजार ७३५
रत्नागिरी चार कोटी ६१ लाख चार हजार ६८५
सिंधुदूर्ग ५३ लाख ११ हजार

Web Title: State Government finally provides Rs. 90.7 million assistance to Konkan over-flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस