नवीन कॉलेज प्रवेशाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे
By admin | Published: June 24, 2016 02:04 AM2016-06-24T02:04:20+5:302016-06-24T02:04:20+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे.
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. मात्र, राज्य शासनाने पुणे व पिंपरी येथे नव्या ४३ कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने या महाविद्यालयातील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ७३ हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आॅनलाईन अर्ज करणारे ७३ हजार ७६१ विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले असले तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. शासन आदेशाप्रमाणे केवळ आॅनलाईन पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश दिले जाणार असल्याने नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालांमध्ये आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देता येणार नाहीत. त्यामुळे नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया कशी राबवावी याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पुणे विभागाच्या सहसंचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांना त्वरित प्रवेश करण्यास परवानगी दिली जात नाही. पायाभूत सुविधांची तपासणी करून ‘प्रथम मान्यता’ दिली जाते.