कोरोना रुग्ण, मृतांची संख्या राज्य सरकार लपवत राहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 06:52 AM2020-09-25T06:52:08+5:302020-09-25T06:52:24+5:30
देवेंद्र फडणवीस यांचा आरोप : चाचण्या, बेड्स वाढविण्याची गरज
विकास मिश्र।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासूनच महाराष्टÑ सरकार संसर्गित रुग्ण आणि मृतांची संख्या लपवत राहिल्याने स्थिती अतिशय गंभीर बनली, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्याची व इस्पितळात खाटा वाढविण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरील प्रश्नांना मुद्देसूदपणे उत्तरे देत परखड मते मांडली.
विशेषत: कोविड-१९ ची साथ आणि महाराष्ट्रातील स्थितीवर बोलताना त्यांनी रोखठोकपणे सांगितले की, राज्य सरकारकडून १०० चुका झाल्या. कोरोनाविरुद्ध लढण्याऐवजी सरकार कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या कमी कशी दाखविता येईल, याच खटाटोपात होते. त्यामुळेच चाचण्या (टेस्टिंग) कमी करण्यात आल्या. आज बिहारमध्ये दररोज दीड लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत, तर महाराष्टÑात जवळपास ९० हजार चाचण्या होत आहेत. मागच्या २० दिवसांत महाराष्टÑात संसर्गाचा दर २५ टक्क्यांहून जास्त आहे.
मुंबईची लोकसंख्या दोन कोटी आहे; परंतु नागपूरएवढ्याच चाचण्या मुंबईत होतात. देशाच्या तुलनेत कोरोनामुळे महाराष्टÑात सर्वाधिक मृत्यू होत आहेत, हे दुर्दैव आहे. निश्चितच नियोजनात चूक झाली आहे. भीतीपोटी चाचण्या कमी करू नका. आवश्यक सुविधा वाढवून त्वरेने व्यवस्था केली तरच समस्यांवर मात करण्याची आशा बाळगू शकतो.