कांद्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही
By admin | Published: August 26, 2016 04:18 AM2016-08-26T04:18:05+5:302016-08-26T04:18:05+5:30
राज्यात कांद्याच्या बाबतीत उद्भवलेली परिस्थिती धक्कादायक आहे.
पुणे : राज्यात कांद्याच्या बाबतीत उद्भवलेली परिस्थिती धक्कादायक आहे. यापूर्वी इतकी वाईट परिस्थिती कधी नव्हती, असे सांगून राज्य शासन याबाबत गंभीर नसल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात केली. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, १५ दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्लीत यासंदर्भात बैठक झाली होती. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री या बैठकीस उपस्थित होते. त्यात केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी निम्मा भार उचलून नाफेडमार्फत बाजारभावाने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, बंदच्या काळात केंद्राने व राज्य सरकारने ही जबाबदारी घेणे आवश्यक होते. पण त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र शासनाकडे पाठविलाच नाही. त्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. हा प्रश्न सोडविण्याबाबत सरकार किती गंभीर आहे, हे यावरून कळते. राज्य सरकारने आतातरी जागे होऊन तातडीने हा प्रस्ताव पाठवावा किंवा दुसरा पर्याय द्यावा. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)
>कांदा खराब होता तर विक्रीस कसा आला?
कांदा खराब असल्याने त्याला ५ पैसे प्रतिकिलो दर मिळाला, या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले की, कांदा कसा होता हे मला माहीत नाही, पण कांद्याला भाव मिळत नाही ही परिस्थिती आहे. तसेच तो खराब होता तर विक्रीसाठी कसा आला?