तरुणांनो, लागा तयारीला! ठाकरे सरकार पोलीस खात्यातील साडे बारा हजार पदं भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 05:31 PM2020-09-16T17:31:01+5:302020-09-16T17:52:22+5:30
आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती; लवकरच प्रक्रियेला सुरुवात
मुंबई: राज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुण, तरुणींसाठी मोठी संधी असेल. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशमुख यांनी दिली.
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, (१/२) pic.twitter.com/ZBvz3FVqs4
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 17, 2020
राज्यातल्या पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदं लवकरच भरली जाणार असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुखांनी ट्विट करून दिली होती. अखेर आज मंत्रिमंडळात याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर अखेरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं देशमुख यांनी ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच पोलीस भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
पोलिसांसमोर कोरोनाचं मोठं संकट
सध्या राज्यावर कोरोनावर मोठं संकट आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील हजारो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलीस दलातील पावणे दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात १५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत २ हजार ५० अधिकाऱ्यांसह १८ हजार ८९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १४ हजार ९७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला ३ हजार ७२९ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ४६१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.