कोळसा टंचाई हे ‘त्यांचे’ पाप, पत्र देऊनही कोळसा उचलला नाही; दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:04 AM2021-10-21T07:04:04+5:302021-10-21T07:04:24+5:30
कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे टंचाई निर्माण झाली. टंचाईचे पाप राज्य शासनाचे असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
औरंगाबाद : कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे टंचाई निर्माण झाली. टंचाईचे पाप राज्य शासनाचे असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. अलीकडच्या पंधरवड्यात कोळसा पुरवठा पूर्ण क्षमतेने झाला नाही. त्यामुळे राज्यात औष्णिक वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती घटली होती. कोळसा टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनावर निशाणा साधून वेळेत कोळसा पुरवठा होत नसल्याचा आरोप केला होता. त्यावर दानवे यांनी बुधवारी खुलासा करीत कोळसा टंचाई हे राज्य सरकारचे पाप असल्याचा आरोप केला. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोळसा भरपूर आहे. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खदानींमध्ये पाणी साचले. अतिवृष्टीपूर्वी केंद्र सरकारने राज्याला पत्र देऊन कोळसा उचलण्यास सांगितले होते. परंतु राज्य सरकारने कोळसा उचलू शकत नाही, असे कळविले. समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वेसाठी पाहणी सुरू असून मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे, अशी माहितीही दानवे यांनी यावेळी दिली.