बाहेरचे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेता येणार- राज्य सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:15 PM2018-07-13T12:15:03+5:302018-07-13T12:22:55+5:30
मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाणाऱ्यांची आर्थिक बचत होणार
नागपूर: मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाणाऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेणाऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही, तसा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे मल्टिप्लेक्समधील महागडे पदार्थ घेण्याची गरज भासणार नाही. बाहेरुन घेतलेले पदार्थदेखील मल्टिप्लेक्समध्ये नेता येतील.
राज्यातील विविध महानगरांमधील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कुठलीही बंदी नाही. बाहेरचे खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये कोणी आडकाठी करत असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली. मुंडे यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून मल्टिप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतील खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री याकडे सरकारचे लक्ष वेधले होतं.
मल्टिप्लेक्स चालक बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करतात आणि आतमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री करतात, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. यासंबंधी कायदा करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर पाण्याची बॉटल किंवा अन्य खाद्यपदार्थ यांचे दर मल्टिप्लेक्स, मॉलमध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे का? असा प्रश्न मुंडेंनी विचारला. त्यावर केंद्र सरकारनं केलेल्या कायद्याप्रमाणे 1 ऑगस्टपासून एकाच वस्तूची किंमत सगळीकडे सारखी असेल, असं राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.