Maharashtra Unlock News: अनलॉकचा गोंधळ! आधी मंत्र्यांची एक घोषणा; नंतर सरकारची दुसरीच भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 09:27 AM2021-06-04T09:27:17+5:302021-06-04T09:30:43+5:30

वडेट्टीवार यांच्या घोषणेला छेद देणारे निवेदन आधी मुख्यमंत्री कार्यालयाने आणि नंतर माहिती व जनसंपर्क विभागाने काढले. 

state government says no after Congress ministers unlock announcement | Maharashtra Unlock News: अनलॉकचा गोंधळ! आधी मंत्र्यांची एक घोषणा; नंतर सरकारची दुसरीच भूमिका

Maharashtra Unlock News: अनलॉकचा गोंधळ! आधी मंत्र्यांची एक घोषणा; नंतर सरकारची दुसरीच भूमिका

Next

मुंबई : राज्यातील १८ जिल्हे पूर्णत: अनलॉक करण्यात आले असून तेथील सगळे व्यवहार शुक्रवारपासून सुरू होतील, पाच स्तरांवर अनलॉकची प्रक्रिया केली जाईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी केली. मात्र, तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने काही तासातच स्पष्ट केल्याने या विषयावरील सरकारी गोंधळ समोर आला.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी झाली.  त्यानंतर बैठकीतील निर्णयांची माहिती वडेट्टीवार यांनी पत्र परिषद घेऊन दिली. कोणत्या जिल्ह्यात काय अनलॉक होणार, हेही त्यांनी सांगितले. मात्र, वडेट्टीवार यांच्या घोषणेला छेद देणारे निवेदन आधी मुख्यमंत्री कार्यालयाने आणि नंतर माहिती व जनसंपर्क विभागाने काढले. 

यानिमित्ताने लॉकडाऊनसंदर्भात सरकारमध्ये  समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली असून मुख्यमंत्री त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितल्याने लगेच माध्यमांमधून १८ जिल्हे शुक्रवारपासून अनलॉक करण्यात आले असल्याची बातमी झळकली. सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले की, ब्रेक द चेनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्‌सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्याआधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना नंतर काढण्यात 
येतील.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे, असेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

१८ जिल्ह्यांत पूर्णपणे लॉकडाऊन उघडण्यात येणार
असा आहे अनलॉकचा प्रस्ताव...
औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. या १८ जिल्ह्यांत पूर्णपणे लॉकडाऊन उघडण्यात येणार असून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू होतील. मात्र् याबाबतची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.

 या जिल्ह्यांत ५० टक्के क्षमतेने व्यवहार...
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांत खालीलप्रमाणे व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे. 
मॉल्स, थिएटर, रेस्टॉरंट, जिम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
लोकल सेवा बंद राहणार
सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला पूर्ण क्षमतेने परवानगी असेल
बसेस १०० टक्के क्षमतेने, उभ्याने प्रवास करण्यास मनाई
खासगी आणि सरकारी कार्यालये १००% उपस्थितीत सुरू राहतील
इंडोअर आणि आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत परवानगी
चित्रपट, सिरिअलच्या चित्रिकरणाला परवानगी
सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने करता येणार
लग्नसोहळे हॉल मर्यादेच्या ५० टक्के उपस्थितीत किंवा जास्तीत जास्त १०० जणांना परवानगी
अंत्यसंस्कारासाठी कोणतेही बंधन नसेल
राजकीय बैठका, स्थानिक निवडणुका ५० टक्के क्षमता
बांधकाम साईट पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
 कृषिविषयक दुकाने पूर्ण सुरू
 ई कॉमर्स पूर्ण क्षमतेने सुरू राहील

तिसऱ्या स्तरातील १० जिल्ह्यांत अंशत: अनलॉक
अकोला, बीड, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांत अंशत: निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. 
अत्यावश्यक सेवेतील दुकाने संपूर्ण आठवडा सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू. राहतील
मॉल्स, थिएटर बंदच राहतील
रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. २ वाजतानंतर होम डिलिव्हरी सुरू राहील.
लोकल सेवा बंदच राहील.
सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ या वेळेत परवानगी असेल
खासगी, शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी
इंडोअर आणि आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ या वेळेत सोमवार ते शुक्रवार परवानगी
चित्रपट, सिरिअल चित्रिकरण स्टुडिओत करण्यास परवानगी, मात्र गर्दी जमेल अशा चित्रिकरणाला परवानगी नाही
सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेल
लग्नसोहळे यांना ५० लोक उपस्थित राहण्यास परवानगी
अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगी
राजकीय बैठका, स्थानिक निवडणुका ५० टक्के क्षमता
बांधकाम ऑन साईट, म्हणजे कर्मचारी तिथेच राहत असतील तर परवानगी
ई कॉमर्स सकाळी ७ ते २ पर्यंत परवानगी

वडेट्टीवारांचा ‘यू-टर्न!’ : अनलॉकसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण आल्यानंतर  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यू-टर्न घेत, अनलॉकला तत्त्वत: मान्यता मिळाल्याचे सांगितले. तसेच याबाबतचा निर्णय स्वत: मुख्यमंत्री शुक्रवारी जाहीर करतील, असे सांगितले.

आज होऊ शकते घोषणा
अनलॉकसंदर्भात नव्या नियमावलीची घोषणा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी  करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 पुणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी नियमावली
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत  सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद राहतील
मॉल्स, थिएटर बंदच राहतील
रेस्टॉरंट केवळ होम डिलिव्हरीसाठी सुरू राहतील
सलून, जिम ५० टक्के क्षमतेने वातानुकूलित यंत्राचा वापर न करता
लोकल सेवा बंदच राहील
सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ या वेळेत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेल
खासगी, शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी
इंडोअर खेळास बंदी असेल, तर आऊटडोअर 
खेळ सकाळी ५ ते ९ या वेळेत सोमवार ते 
शुक्रवार परवानगी
सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही
लग्नसोहळे यांना २५ लोक उपस्थित राहण्यास परवानगी
अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगी
स्थानिक निवडणुका ५० टक्के क्षमता
कृषिविषयक दुकाने सकाळी ७ ते  दुपारी २ या वेळेत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील
बांधकाम ऑन साईट, म्हणजे कर्मचारी तिथेच राहत असतील तर परवानगी
ई कॉमर्स केवळ अत्यावश्यक सेवेतील वस्तूंसाठी सुरू राहील
सार्वजनिक बसेस ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील

Web Title: state government says no after Congress ministers unlock announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.