Ashish Shelar On Nawab Malik : "नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्या यंत्रणांमधील लोकांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 12:58 PM2021-11-02T12:58:25+5:302021-11-02T12:58:25+5:30
भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची मागणी.
"मंत्री नवाब मलिक यांची सवयच लपवाछपवी आणि बनवाबनवीची आहे. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यातील काही आरोप गंभीरही आहेत. मंत्री नवाब मलिक यांच्याकडे अजूनही काही माहिती असू शकते. म्हणून नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या यंत्रणा मधल्या लोकांची दोघांचीही नार्को टेस्ट राज्य सरकारने करावी दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे," अशी मागणी करीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
"गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या एका मंत्र्याचे फुसके बार फुटत होते, त्याचं वर्णन एवढच करता येईल की, दिवाळीनंतर जो बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोडणार आहेत तो बॉम्ब फुटण्या आधीच घाबरून मलिक यांनी कानावर हात कसे ठेवले, त्याचं चित्र, आज त्यांचा बदललेला आवाज, बदललेला चेहरा आणि बदलेला संवाद यातून स्पष्ट झाले आहे. पण तरीही दिवाळीनंतर बाँम्ब फुटेलच. कारण सत्याला कशाची ही डर असण्याचे कारण नाही," असे शेलार म्हणाले.
विषय भरकटवू नये
"सुरुवातीला आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो समीर वानखेडे यांना चारित्र्याच प्रमाणपत्र देणं हे भाजपचं काम नाही. ड्रग्जच्या विरोधात बिनतोड कारवाई केलीच पाहिजे. यात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्यकता नाही, हीच भाजपची मागणी आहे. त्यामुळे मुद्दाहून विषय कुठेतरी भरकटत नेण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी करु नये," असे ते म्हणाले.
"जिथे चरस,गांजा ड्रग्ज आणि त्यांच्या भाषेतला हर्बल तंबाखू कितीही प्रमाणात सापडला आणि तो कायद्याने गुन्हा असेल तर कारवाई झालीच पाहिजे. त्याचं मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. 0.200 मिली ड्रग्ज अथवा तत्सम गोष्ट मिळाली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ही कारवाई व्हावी," असंही शेलार म्हणाले.
गोष्टी आर्यनच्या अटकेनंतरच्या नाहीत
सवाल हा निर्माण होतोय की, गेल्या दहा पंधरा दिवसापासून म्हणजे आर्यन खानला अटक झाल्यानंतर जी माहिती मंत्री महोदय देत आहेत याचा बहुतांश गोष्टी आणि माहिती या आर्यन खान यांना झालेल्या अटकेनंतरच्या नाहीत. ही सर्वसाधारण दिलेली माहिती आहे. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे, ही माहिती नवाब मलिक यांचा जावई आठ महिने अटकेत असताना त्यांना होती ना? तुम्ही ती लपवून का ठेवली? मा.राज्यपाल महोदयांसमोर तुम्ही काय शपथ घेतली ? गुन्हे, गुन्हेगारी आणि गुन्हेगार संबंधात माहिती लपवण्याची शपथ आपण घेतली होती का ? ही बाब आता राज्यपाल महोदयांनी तपासला पाहिजे आणि याचे उत्तर मंत्री नवाब मलिक यांनी दिला पाहिजे. त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला असून गुन्हेगारी आणि गुन्हा कार्यपद्धती संबंधीची माहिती लपवणे हा फौजदारी गुन्हा आहे का? याबद्दलची सुद्धा स्पष्टता झाली पाहिजे असल्याचं शेलार यांनी सांगितलं.
सरकारची ढाल
"मलिक यांनी यंत्रणांमधील ज्यांच्यावर आरोप केले ते गंभीर आहेत. शिवाय ls सरकारची ढाल पुढे करून तसेच ना कोर्टासमोर जात आहेत, ना पोलीस यंत्रणा समोर जात आहेत, ना शपथेवर कोर्टासमोर काही दावा दाखल करीत आहेत आणि आठ महिने ती माहिती त्यांच्याकडे होती, लपवली. त्यामुळे माननीय नवाब मलिक यांची आणि त्यांनी आरोप केले त्या यंत्रणामधील लोकांची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी," अशी मागणी त्यांनी केली. राज्याच्या सरकारने दोघांची टेस्ट करावी.
किंबहुना जर नार्को पासून आरोप करणाऱ्यांना लपवालपवी करणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याला या दोघांना समान पद्धतीने राज्य सरकारने वागवलं नाही तर यात राज्य सरकार मध्ये बसलेल्या अन्य लोकांविषयीचा संशय बळावेल म्हणून दोघांचीही टेस्ट करा, समान न्याय द्या," असेही अशिष शेलार म्हणाले.