राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावात ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी : पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 07:12 PM2020-09-11T19:12:17+5:302020-09-11T19:34:01+5:30
सप्टेंबरच्या अखेरीस नगर, बीड व मराठवाड्यातून लाखो ऊसतोडणी कामगार कारखान्यांचा उसतोडण्यासाठी म्हणून बाहेर पडतील
पुणे : ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस नगर, बीड व पुढे मराठवाड्यातून लाखो ऊसतोडणी कामगार कारखान्यांचा उसतोडण्यासाठी म्हणून बाहेर पडतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणीसाठी लाखोच्या संख्येत स्थलांतर करणाऱ्या उसतोडणी कामगारांचे आरोग्यासह विविध प्रश्न हंगाम सुरु होण्याआधीच ऐरणीवर आले आहेत. मात्र, ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी राज्य सरकारनेही घ्यावी असे स्पष्ट मत माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केले.
मुंडे म्हणाल्या, कामगारांच्या संघटना, कोरोना विषाणूचा विळखा पडू नये तसेच त्यांच्यापासूनही कोणाला बाधा होऊ नये यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने त्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपवली आहे. कामगार थेट शेतात काम करणार असले तरी कारखान्याने त्यांच्यासाठी सॅनिटायझर, मास्क व अन्य आरोग्य सुविधा पुरवाव्यात असे कारखान्यांना कळवण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगारांनी शक्यतो लहान मुले व वृद्धांना बरोबर नेऊ नये असे आवाहनही केले आहे.
साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या सुचनांचे स्वागत आहे, पण ही जबाबदारी सरकारचीही आहे. उसतोडणीसाठीचे हे स्थलांतर मोठे असते. त्यांची अपरिहार्यता लक्षात घेऊन सरकारनेही त्यांना आरोग्याच्या वेगवेगळ्या सुविधा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. हे सगळे कामगार असंघटित आहेत. त्यांना कंपनी कायदा लागू होत नाही. त्यामुळे कारखाने कसलीही सुविधा देत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची काळजी घेणे सरकारचे काम आहे मजुरांच्या आरोग्यविषयी असेही माजी मंत्री मुंडे म्हणाल्या.
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, वृद्धांना बरोबर न्यायला मनाई करणे शक्य होते, मात्र तसे न करता फक्त आवाहन करण्यात आले आहे. अनेक कुटुंबांना वृद्ध व्यक्तींना मागे एकटे ठेवणे शक्य नसते. त्यामुळे चर्चेअंती मनाई करायची नाही असे ठरवण्यात आले, मात्र त्यांना कामावर न नेता मुक्कामाच्या ठिकाणी ठेवावे, त्यांच्यासाठी कारखान्यांनी वेगळी व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे. मुलांसाठी साखर शाळा, अगदी लहान मुलांसाठी पाळणाघरे या नेहमीच्या सुविधा याही वेळी कारखान्यांनी करायच्या आहेत.
............................
मजूरीतील दरवाढ हा लवादाचा विषय आहे. साखर संघाची याविषयाबाबत लवकरच बैठक होत आहे. त्यांनी ठरवलेल्या दराबाबत यासंबधीच्या लवादात चर्चा होईल. त्यात कामगारांची प्रतिनिधी म्हणून मी, साखर कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री जयत पाटील व अन्य काही वरिष्ठ अधिकारी आहेत. तिथे चर्चा होऊन दर ठरेल. आत्ता तरी कामगारांच्या वतीने आम्ही काही प्रस्ताव वगैरे दिलेला नाही, मात्र कोरोना मुळे या कामगारांची झालेली परवड लक्षात घेता दरवाढ दिली पाहिजे. ती किती याबाबत लवादात निर्णय होईल.
पंकजा मुंडे, माजी मंत्री