राज्यात सरकारचे ट्विटर वॉर
By Admin | Published: July 17, 2016 12:54 AM2016-07-17T00:54:17+5:302016-07-17T00:54:17+5:30
खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही
पुणे : खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही मंत्र्यावर कसलेही नियंत्रण नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विधिमंडळात काँग्रेस पक्ष याचा समाचार घेईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महागाई वाढत आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर सरकारचे नियंत्रण हवे ते त्यांना ठेवता येत नाही. तूरडाळीची किंमत वाढत आहे. अनेक मंत्र्यांची विविध प्रकरणे बाहेर येत आहेत. यातून मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नाही हेच दिसते. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. त्यात या विषयांवरून सरकारला धारेवर धरले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबत भाजपाकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. साध्वी प्राची, साक्षीमहाराज हे त्यांचे नेते काय बोलतात याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. त्यांची भाषणेही तेढ निर्माण करणारी आहेत. ती खपवून घेतली जातात व डॉ. नाईक यांच्यावर कारवाईची भाषा केली जाते हे बरोबर नाही. कारवाई करायची तर ती असे भडक बोलणाऱ्या सर्वांवरच करावी. ‘काँग्रेसमुक्त भारत’, ‘मुस्लीममुक्त भारत’ हे बोलणेही आक्षेपार्ह आहे, असे काँग्रेसचे मत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
झाकीर नाईक यांच्याबाबत
अहवाल आला नव्हता
मुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबतचा प्रतिकूल अहवाल आला होता, मात्र तत्कालीन सरकारने तो दाबून टाकला, या माजी पोलीस महासंचालक व भाजपाचे विद्यमान खासदार सत्यपाल यांच्या आरोपाची चव्हाण यांनी खिल्ली उडविली. मी व पृथ्वीराज चव्हाण असे दोघेही माजी मुख्यमंत्री इथे आहोत व असा कोणताही अहवाल आमच्याकडे आलेला नव्हता. निवृत्त झाल्यावर व भाजपाचा खासदार झाल्यानंतर त्यांना बरेच काही आठवत असेल, असे चव्हाण म्हणाले.
महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय स्थानिक स्तरावर घेतला जाईल. त्यांच्या अहवालाचा विचार करूनच काँग्रेस काय ते ठरवेल. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्ण तयारीत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याची पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्याचे, शहराचे अध्यक्ष साह्य करतील. अशी पाच ते सहा प्रमुख नेत्यांची एक समिती निवडणुकीसंबंधीचे काम करेल. पुण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जबाबदारी आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस