भाजपाच्या नेत्यांमुळेच राज्य सरकार अस्थिर
By Admin | Published: August 4, 2016 04:38 AM2016-08-04T04:38:06+5:302016-08-04T04:38:06+5:30
फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव मांडण्याचा प्रयत्न होतो. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जाहीर वक्तव्य करतात. त्यावरून भाजपाचेच नेते फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते, असे राणे म्हणाले.
‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ असे फडणवीस सांगतात. पण ते मी अखंड महाराष्ट्र ठेवीन असे का सांगत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. एकेकाळी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कर्ता असलेल्या फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपाचे मंत्री आणि आमदारांना राज्य तोडायचे आहे. त्यांचा प्रयत्न अयोग्य आहे. उत्तराखंड वगळता छोट्या राज्याचा विकास झालेला नाही. केंद्राच्या निधीवरच अशा राज्यांना अवलंबून राहावे लागते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असे राणे म्हणाले. राज्यातील प्रशासन निष्क्रिय बनले असून त्यावर मुख्यमंत्र्यांसह कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाची अवस्था ‘सैराट’ झाली असल्याची टीका त्यांनी केली. कोकणातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांना निधी देण्यात न आल्यामुळे ते बंद ठेवावे लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>शिवसेनेला टोमणा : विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाईट अवस्था झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून शिवसेना भाजपाबरोबरची युती तोडत नाही, असे राणे म्हणाले.