रेमडेसिवीरचे उत्पादन वाढावे यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी सहकार्य करणार : अस्लम शेख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:40 PM2021-05-06T16:40:58+5:302021-05-06T16:42:58+5:30
Remdesivir : काळा बाजार रोखण्यासाठी सरकार कठोर पावलं उचलणार, अस्लम शेख यांची माहिती
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेकदा रेमडेसिवीरच्या औषधाचा तुटवडा भासत असल्याचं समोर आलं आहे. रेमडेसिवीरचं उत्पादन वाढावं या पार्श्वभूमीवर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देशात सर्वात जास्त रेमडेसिविर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी येथील 'कमला लाईफसायन्सेस लिमिलेड'या कंपनीला भेट दिली. तसंच त्यांनी यावेळी कंपनीचे अध्यक्ष डॉ. दिगंबर झवर आणि उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
"कंपनीच्या वाढलेल्या क्षमतेनुसार महिन्याला तीस लाखांपेक्षा अधिक रेमडेसिवीरचं उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता आहे. कच्च्या मालाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाल्यास ५० लाखांपेक्षा जास्त रेमडेसिवीरचे उत्पादन कंपनी घेऊ शकते. देशात रेमडेसिवीरचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते," असं अस्लम शेख यावेळी म्हणाले.
मोठ्या प्रमाणात काळा बाजार
राज्यात व देशात रेमडेसिवीरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होत आहे. रेमडेसिवीरच्या एका कुपीची किंमत फार-फार तर दोन हजार असायला हवी. मात्र, काळ्या बाजारात वीस हजारांपेक्षा जास्त दराने याची विक्री होत आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी आगामी काळात राज्य सरकार कठोर पऊलं उचलणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.