दोन दिवसांत शेतकऱ्यांसाठी मदतीचा निर्णय जाहीर करू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By कुणाल गवाणकर | Published: October 21, 2020 11:50 AM2020-10-21T11:50:30+5:302020-10-21T12:08:53+5:30
मुख्यमंत्र्यांकडून उस्मानाबादमधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी
उस्मानाबाद: सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करू शकत नाही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उस्मानाबादमधल्या काटगावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. या संकटावर आपण नक्की मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तुमच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडण्याचं काम याआधीही मी केलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो. माझं कर्तृत्व शून्य आहे, असं मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले. 'यंदाचं वर्ष संकटांचं आहे. वर्षाची सुरुवातच कोरोना महामारीनं झाली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार माजवला. आता परतीच्या पावसानं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आधी कधीही झाला नव्हता इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे अगदी होत्याचं नव्हतं झालं आहे. मात्र आपण या परिस्थितीतूनही सावरू. पण तुम्ही धीर सोडू नका,' अशी साद मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना घातली.
‘लाव रे तो व्हिडीओ’तून मनसेची मुख्यमंत्र्यांना आठवण; “स्वत:ची मागणी पूर्ण करा अन्...”
राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. 'मी सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करत नाही. आकडे लावण्यात मला रस नाही. मी जे बोलतो, ते करतो. पण जे करू शकत नाही, ते मी बोलत नाही. त्यामुळे मी उगाच घोषणा करणार नाही. मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.
'मागील वर्षी हेक्टरी 25 हजारांची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मदत जाहीर करावी'
'गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी जमीन अक्षरश: खरवडून गेली आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे. पंचनाम्यांचं काम ८० ते ९० टक्के पूर्ण झालं आहे. एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक होईल. तुम्हाला पुन्हा उभं करणार हा माझा शब्द आहे. तुम्ही धीर सोडू नका. खचून जाऊ नका. हे तुमचं सरकार आहे. या संकटाशी आपण दोन हात करू,' असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.