राज्य सरकार करणार लसनिर्मिती, हाफकिनला मान्यता देण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 02:57 AM2021-03-18T02:57:55+5:302021-03-18T07:11:00+5:30
पंतप्रधान मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी दृूरदृष्य प्रणालीद्वारे संपर्क साधला. राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळाल्यास लसीकरणाचा वेग वाढवता येईल.
मुंबई : कोरोनाच्या लसची निर्मिती स्वत: करण्याची तयारी आता राज्य सरकारने सुरू केली असून, शासनाच्या अखत्यारितील हाफकिन इन्स्टिट्यूटला लसनिर्मितीसाठी मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. (The state government will manufacture the vaccine, the chief minister asked the prime minister to approve Halfkin)
पंतप्रधान मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी दृूरदृष्य प्रणालीद्वारे संपर्क साधला. राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळाल्यास लसीकरणाचा वेग वाढवता येईल. त्यासाठी हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी द्या, असे साकडे ठाकरे यांनी यावेळी घातले. त्याला लगेच प्रतिसाद देत, सर्वच राज्यांमधील लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याची केंद्राची भूमिका असेल, असे मोदी यांनी जाहीर केले.
राज्यात दररोज तीन लाखांपर्यंत लसीकरण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. हाफकिनमार्फत १२६ दशलक्ष लसी उत्पादित होऊ शकतात. राज्यात सध्या १ लाख ३८ हजार लसी दररोज सरासरी दिल्या जात आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत लसीकरण तसेच आरटीपीएस चाचण्यांचे प्रमाण समाधानकारक आहे; मात्र ते आणखीही वाढवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावेळी सांगितले. सर्व आरोग्य व पालिका यंत्रणांना परत एकदा युद्ध पातळीवर संपर्क शोधण्याचे काम हाती घेण्यास सांगण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात १ मार्च रोजी ७ हजार ७४१ इतके रुग्ण वाढले होते. १५ मार्च रोजी हा एकदा १३ हजार ५२७ इतका झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून, १ मार्च रोजी पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता तो आता १६ टक्के झाला आहे, यावर चाचण्यांची संख्या अधिक वाढविणे गरजेचे आहे, असे सादरीकरच्या वेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.
साठा वाढवून द्या!
राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून, ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून, तो अधिक वाढवून मिळावा.