एका महिलेने सरकारची दुर्दशा केली; देवेंद्र फडणवीसांचे घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 06:36 AM2020-09-25T06:36:30+5:302020-09-25T06:48:34+5:30
राजाची मानसिकता सोडून द्यायला हवी, सुडाच्या भावनेने काम करीत आहे राज्य सरकार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
>> विकास मिश्र
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांचे सरकार सुडाच्या भावनेने काम करीत आहे. त्यांनी राजाची मानसिकता सोडायला हवी. फडणवीस यांना विश्वास आहे की, उद्धव ठाकरे यांचे सरकार एक दिवस स्वत:हून कोसळेल. हे सरकार पाडण्याची कोणतीच आवश्यकता नाही. ‘लोकमत’शी संवाद साधताना ते म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या चर्चांना काही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्यासाठी करण्यासारखे आणखी बरेच काही आहे. भाजपमध्ये जुन्या चेहऱ्यांना बाजूला केले गेल्याचे बोलले जाते. मात्र, याचाही त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला.
आपण मुख्यमंत्री बनण्यापूर्वी भाजपच्या पोस्टरवर राज्यातील चार-पाच मोठे चेहरे दिसत होते. आता दिसत नाहीत. त्या लोकांना बाजूला केले आहे काय?
नाही. असे काही नाही. भाजप टीमवर विश्वास करतो. आम्ही सर्व निर्णय कोअर कमिटी अथवा टीमच्या माध्यमातून घेतो. भाजपचा पहिला मुख्यमंत्री मी बनलो आणि पाच वर्षे राहिलो. त्याचा असा परिणाम होतो की, आपण रोज चर्चेत असता. जनतेच्या नजरेत आपण पुढे जाता. नाव जास्त समोर येते. जुन्या कोअर कमिटीसोबत पाच वर्षांत नवे सक्षम लोक तयार झाले आहेत. त्यामुळे नवी टीमही तयार झाली. जुन्यांना बाजूला करण्याचा प्रश्नच नाही.
एकनाथ खडसे सातत्याने आपल्यावर आरोप करीत आहेत. आपण का गप्प आहात?
मी त्यांंच्या आरोपांना उत्तर देत नाही. कारण, ते जे काही बोलत आहेत त्यात काही तथ्य नाही. जर त्यांच्या आरोपानंतर लोकांच्या मनात माझ्याबद्दल काही मत तयार झाले तर मला उत्तर द्यायला हवे. सर्वांना माहीत आहे की, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. मग मी का उत्तर देऊ?
भाजप दुसºया पक्षांच्या नेत्यांना का त्रस्त करीत आहे? आयकर विभागाने आता शरद पवार यांना नोटीस दिली आहे.
आम्ही कुणालाही त्रस्त करीत नाहीत. दोन जणांनी तक्रार केली होती. यातील एक जण तर असा आहे ज्यांनी पूर्वी माझी आणि चंद्रकांत दादा यांची तक्रार केली होती. त्यांनीच काही कागदपत्रांसह शरद पवार आणि दुसºया लोकांची तक्रार केली आहे. आम्हाला राजकारण करायचे असते तर दोन महिन्यांपूर्वीच हल्लाबोल केला असता. जेव्हा ही नोटीस जारी झाली होती. कायदा आपले काम करीत आहे.
आपण उद्धव ठाकरे यांच्या सरकारला का त्रस्त करीत आहात? ‘आॅपरेशन लोट्स’सारखे काही आहे काय?
विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी आहे की, सरकारच्या चुका आणि बेजबाबदारपणा समोर आणणे. कोरोनाच्या काळात मी काहीही आरोप केला नाही. सहकार्याच्या सूचना केल्या आहेत. राहिला मुद्दा आॅपरेशन लोट्सचा तर आमच्या मनात ही बाब पक्की आहे की, आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. राजकीय इतिहास पाहिला तर दिसून येईल की, अशी सरकारे चालत नाहीत. आपण सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच फायदा होईल. मी तर असेही म्हटले आहे की, आपण सरकार चालवून दाखवा. आपण सरकार चालवू शकत नाहीत. सरकार चालले तर पडेल. एक दिवस आपोआप पडेल. त्यावेळच्या परिस्थितीनुसार, जर शक्य असेल तर सरकार अवश्य बनवू. हे पाहा, शहरात आॅटो चांगला चालतो; पण नागपूरहून मुंबईसाठी निघाला तर मध्येच फेल होतो. ते मुंबईसाठी निघाले आहेत.
लोक म्हणतात की, आपणास त्रस्त करण्यासाठी मुंढे यांना नागपूरला पाठविण्यात आले होते?
मला असे वाटते की, जर पाठविलेही असेल तर मला काय फरक पडतो? माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही. मनपाचे ठेके आम्ही घेत नाही. कुणीही आले तरी मला त्रस्त करू शकत नाही; पण या सरकारकडून सुडाच्या भावनेने कारवाई केली जाते. यापूर्वी असे झाले नाही. या सरकारला वाटते की, मीडिया असो की, व्यक्ती अथवा राजकीय नेता कोणीही विरोधात बोलू नये, अन्यथा बीएमसीचे लोक त्याच्या घरी जातील. असे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाले नाही. हे सरकार लोकशाहीवादी नाही.
आपला इशारा कंगनाकडे आहे. त्या भाजपमध्ये येणार का?
मला वाटते की, त्यांचा राजकीय कल नाही. हे प्रकरण या सरकारने वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. यांनीच तसे बनविले. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही.
काहींची मानसिकता संकुचित
बिहार निवडणुकीसाठी भाजपने आपल्याला प्रभारी केले आहे. लोकांना असे वाटत आहे की, हा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश आणि महाराष्ट्रातून निरोप आहे.
यापूर्वी अरुण जेटली आणि अनंत कुमार यांच्यासारखे नेते ही जबाबदारी सांभाळत होते. दोन-तीन वर्षांत आम्ही असे अनेक नेते गमावले. पक्ष आता नवी टीम तयार करीत आहे. त्यादृष्टीनेच पक्षाने माझी निवड केली आहे. मी विरोधी पक्षनेता तर आहेच. त्यामुळे महाराष्ट्र सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा मुद्दा लोकांच्या विचारांचा आहे. पूर्वी राज्याच्या एखाद्या नेत्याला मोठी जबाबदारी मिळाली तर सर्व पक्षांचे नेते खूश होत असत की, आपल्या राज्यातील एक व्यक्ती मोठी होत आहे. आजकाल संकुचित मानसिकता आहे; पण त्यांच्या विचारांमुळे काही फरक पडत नाही. राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्रात माझे खूप राजकारण अद्याप बाकी आहे.