विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, पाहा काय म्हणाले केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:16 PM2022-09-16T19:16:14+5:302022-09-16T19:16:54+5:30
राज्य सरकार इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना दिला जाणारा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. पाहा शिक्षण क्षेत्रात काय बदल होणार, काय म्हणाले केसरकर...
राज्यात शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. जर यावर शिक्कामोर्तब झालं तर हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो.
“मुलांना ओव्हरबर्डन करू नये, त्यांच्या मेंदूचा विकास होऊ दिला पाहिजे असं माझं मत आहे. तर गृहपाठ शिक्षकांसाठी पळवाटदेखील असता कामा नये. मला शिक्षकांबद्दल आदर आहे. आपण जे काही अर्धा तास शिकवतो ते त्यांनी लक्षपूर्वक शिकवलं पाहिजे की विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याची आवश्यकताच राहता कामा नये. हे माझं वैयक्तिक मत आहे,” असं केसरकर म्हणाले.
“यासंदर्भात मी शिक्षकांच्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी, संस्था चालकांशी बोलेन आणि त्यानंतर निर्णय घेईन. इतका मोठा निर्णय सहजासहजी घेता येत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी बाब म्हणजे आम्ही आता एज्युकेशनल सिस्टमला जी काही पुस्तकं देतोय ती पूर्णपणे बदलत आहोत. एक धडा झाल्यावर त्यालाच जोडलेले दोन पेपर्स असतील. म्हणजे मुलं धडा झाल्यानंतर त्यातच नोंद करू शकेल. पुस्तकं तीन भागांमध्ये असतील. पुढच्या वर्षी जेव्हा मुल शाळेत जाईल तेव्हा ते एकच पुस्तक घेऊन जाईल. हा प्रयोग १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.