उषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 06:05 AM2020-09-29T06:05:42+5:302020-09-29T06:06:11+5:30
मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या.
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
उषा मंगेशकर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा, जय संतोषी मां, आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इन्कार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत. राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केली. महाविकास आघाडी सरकारकडून भारतरत्न लता दीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. उत्तमोत्तम गायक, संगीततकार घडविण्याचे कार्य या महाविद्यालयात होईल. मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.