"या" पाच शहरांनाही "उडाण"मध्ये सामावून घेण्याची राज्य सरकारची विनंती
By admin | Published: April 1, 2017 02:24 PM2017-04-01T14:24:10+5:302017-04-01T14:24:10+5:30
उडान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अजून पाच शहरांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अजून पाच शहरांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती, गोंदिया, शिर्डी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शहारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव या सहा शहरांता उडाण योजनेत समावेश असून या ठिकाणी अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये विमानाने प्रवास करता येणार आहे. याखेरीज पुणे ते नाशिक हा प्रवासही अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. देशातील ७0 शहरांतील आणि १२८ मार्गांवर विमानप्रवासासाठी ही सोय करण्यात आली आहे.
देशातील ७0 शहरांसाठीच्या विमानसेवेसाठी पाच विमान कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. इंडियन एअरलाइन्सशी संबंधित एअरलाइन अलाइड सर्विसेस, स्पाइसजेट, एअर डेक्कन, एअर ओडिशा, टर्बो मेघा अशी कंपन्यांची नावे आहेत. स्पाइसजेट, एअर डेक्कन व एअरलाइन अलाइड सर्विसेस या कंपन्यांनी सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
या सेवेसाठी सुरुवातीला १७/१८ आसनक्षमता असलेल्या विमानांचा वापर केला जाणार आहे. या कंपन्यांनी एका तासाच्या प्रवासासाठी अडीच हजार रुपयांहून अधिक रक्कम आकारू नये, असे बंधन घालण्यात आले आहे.
नागरी विमान वाहतूक सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले की, ७0 शहरांची सध्या उडानसाठी निवड करण्यात आली आहे. या ७0पैकी ३१ विमानतळांवर सध्या विमाने येत वा जात नाहीत, तर १२ विमानतळे पूर्ण क्षमतेने वापरली जात नाहीत.
सिमला-कुल्लु मनाली आले टप्प्यात
ही सेवा सिमला व कुल्लु-मनालीसाठीही असेल. सध्या मुंबईहून हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी विमानसेवा नाही; आणि दिल्लीहूनही तिथे जाण्यासाठी विमानसेवा नाही. त्यामुळे दिल्लीहून बसने सिमला वा रेल्वेने चंदीगढ व तेथून सिमला असे जावे लागते आणि त्यात खूपच वेळ लागतो. आता मात्र दिल्लीहून तिथे थेट विमानाने जाता येईल.