मुंबई महापालिकेवर राज्य सरकारचा ‘वॉच’
By Admin | Published: June 21, 2016 04:21 AM2016-06-21T04:21:40+5:302016-06-21T04:21:40+5:30
राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणक्यावर दणके देण्यास सुरुवात केली आहे़ पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क लेखापरीक्षक
मुंबई : राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणक्यावर दणके देण्यास सुरुवात केली आहे़ पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क लेखापरीक्षक पाठविण्यात येणार आहे़ पालिकेची इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच नेमणूक असणार आहे़ त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असूनही शिवसेनेचे धाबे दणाणले आहे़
राज्य शासनाच्या लेखा-सेवा विभागाचे साहाय्यक संचालक सुरेश कचरू बनसोडे यांची महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावर स्थायी समितीचे अधिकार डावलण्याचा हा प्रकार असून या नियुक्तीला तीव्र विरोध करू, असा इशाराही सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला. दरम्यान आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नेमणूक म्हणजे भाजपाने
वचक ठेवण्यासारखे असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़ त्यामुळे ही नियुक्ती रद्द करून घेण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना सुरू आहे़ त्यानुसार पालिकेचे प्रभारी मुख्य लेखापरीक्षक अनिल बडगुजर यांनाच कायम ठेवण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे़
चिटणीस आणि लेखा विभाग स्थायी समितीच्या अखत्यारित असल्याने राज्य सरकारने अशापद्धतीने अधिकारी पाठविणे अयोग्य असल्याचा सूर शिवसेनेने लावला आहे़ (प्रतिनिधी)
..............................
बनसोडे यांना सूत्र नाहीच़़
मुख्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्त झालेले सुरेश बनसोडे यांना येत्या तीन चार दिवसांमध्ये पदभार स्वीकारायचा आहे़ मात्र शनिवारी ते पालिका मुख्यालयात आले होते़ परंतु आयुक्त त्यावेळी नसल्याने बनसोडे यांना सूत्र देण्यास अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी नकार दिला़ बनसोडे यांनी आज पुन्हा दूरध्वनी केला असता त्यांना नकारच मिळाला़़
..............................
विधि समितीचे मत घेणार
बाहेरील अधिकाऱ्याला महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास न्यायालयाची स्थगिती आहे़ ही स्थगिती उठविल्याचा दावा बनसोडे यांनी केला असल्याचे समजते़ मात्र पालिका प्रशासन याबाबत अद्याप संभ्रमातच आहे़ त्यामुळे याप्रकरणी विधि विभागाचे मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते़