राज्यातील व्यायामशाळा एफडीएच्या रडारवर, विनापरवाना औषधांचा सर्रास वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 08:56 AM2022-11-16T08:56:44+5:302022-11-16T08:58:21+5:30
gyms : राज्यासह मुंबईतील व्यायामशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
मुंबई : राज्यासह मुंबईतील व्यायामशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. व्यायामशाळेत प्रशिक्षकाचा सल्ला न घेता उत्तेजनात्मक औषधे घेऊन मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असताना नुकतेच एफडीएने मीरारोड येथील विनापरवाना औषधांचा वापर करणाऱ्या व्यायामशाळेतून तब्बल ५ लाख ३१ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे.
मुंबईतील अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना १० नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, क्षेत्रीय औषध निरीक्षक यांच्या पथकाने कन्हैया कनोजिया यांच्या मालकीच्या मे. के-५ फिटनेस ॲण्ड वेलनेस स्टोर, शॉप नं. २, सरोगे एवेन्यू, बेवेर्ली पार्क, कनाकिया रोड, मीरा रोड (पु.), जि. ठाणे या दुकानात पंचासह तपास आणि चौकशीसाठी धाड टाकली. या जागेत व्यायामशाळेत बॉडी बिल्डर्सद्वारे गैरवापर करीत असलेल्या मेफेनटरमीन इंजेक्शन, टेस्टोसटेरोण इंजेक्शन, ग्रोथ होर्मोन इंजेक्शन आणि विविध प्रकारच्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा विनापरवाना विक्रीसाठी ठेवला होता.
दुकानाचे मालक कन्हैया कनोजिया हे वेगवेगळ्या व्यायामशाळांमध्ये जाऊन लोकांना प्रशिक्षण देतात. त्यांच्या दुकानात आढळून आलेला विविध उत्तेजनात्मक औषधांचा साठा हा स्वतःसाठी असल्याचे जबाबात सांगितले. मात्र, लाखोंचा साठा स्वतःच्या वापरासाठी बाळगणे चुकीचे असल्याचे दिसून येते.
सखोल चौकशी होणार
कन्हैया कनोजिया यांनी ही औषधे कुठून प्राप्त केली, तसेच त्याची विक्री कोणास व कोणत्या व्यायामशाळांमध्ये करण्यात आली याबाबत अधिक सखोल चौकशी करण्यात येत असून सर्व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित आहे.
बॉडीबिल्डर्स डॉक्टरांचा सल्ला न घेता उत्तेजनात्मक औषधांचा वापर करतात. या औषधांचा मुख्य उपयोग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या आजारांवर होतो. आजार नसताना हे औषधे घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - गौरीशंकर ब्याळे, सहआयुक्त