राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाला दिला जातोय भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 05:50 PM2017-08-26T17:50:58+5:302017-08-26T17:51:51+5:30
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज दीड दिवासांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे
ठाणे, दि. 26 - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज दीड दिवासांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. शहरांच्या विविध ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनास हळूहळू सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी पावसानेही हजेरी लावली आहे. कोणी गाडीतुन, कोणी रिक्षेतून बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात आहे. शुक्रवारी (दि.25) गणपतीचं घरोघरी आगमन झालं होतं. दीड दिवस बाप्पाची पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप दिला जातो आहे.
ठाण्यामध्ये दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी लोकांची गर्दी दिसून येते आहे. ठाणे पोलिस आयुक्तलायान्तर्गत तब्बल 40 हजारहून अधिक गणेश मूर्तिचे विसर्जन केलं जाणार आहे. सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस यंत्रनेबरोबर महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, 500 प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आवश्यक विद्युत व्यवस्थाही केली आहे. विसर्जनासाठी महापालिकेने कृत्रिम तलाव, श्री गणेश मूर्ति स्वीकार केंद्रची व्यवस्था केली आहे.