राज्यात चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, कोकणात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:51 AM2018-06-23T04:51:19+5:302018-06-23T04:51:23+5:30
राज्यातील बहुतांश भागात येत्या मंगळवारपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज भारतीय कृषी हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे/मुंबई : राज्यातील बहुतांश भागात येत्या मंगळवारपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज भारतीय कृषी हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मान्सून राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून, पुढील चार दिवस चांगल्या पावसाचे राहणार आहेत. कोकणात २५ आणि २६ जूनला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होईल.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४८ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार वृष्टी होईल. विदर्भात पुढील ४८ तासांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.