राज्याला मिळाल्या दोन कोटी लसी, पण दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोससाठीच प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 08:19 AM2021-11-21T08:19:41+5:302021-11-21T08:20:28+5:30

राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

The state has received two crore corona vaccines, but two crore beneficiaries are waiting for the first dose | राज्याला मिळाल्या दोन कोटी लसी, पण दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोससाठीच प्रतीक्षेत

राज्याला मिळाल्या दोन कोटी लसी, पण दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोससाठीच प्रतीक्षेत

Next

मुंबई : संसर्गाची स्थिती नियंत्रणात असताना आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन कोटी लस मात्रा उपलब्ध आहेत. याखेरीज पहिला डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी एवढीच आहे. जानेवारीत लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून हा लस मात्रेचा सर्वाधिक साठा आहे.

राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाने मोहिमेची गती वाढविण्यासाठी लस साक्षरतेला सुरुवात केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, लसीकरणादरम्यान असा चढ-उताराचा काळ येतो. त्यामुळे लसीकरणचा वेग वाढविण्यासाठी तळागाळात जाऊन जनजागृती करावी लागते. त्यानुसार विशेष लसीकरण मोहीम हा विशेष सत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम गतीने सुरू आहे.

१०० टक्के मुंबईकरांनी घेतला पहिला डोस
राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, राज्याच्या सार्वजनिक लसीकरण केंद्रावर सध्या दोन कोटी लक्ष मात्रेचा साठा आहे; तर खासगी क्षेत्रात मात्र याचे प्रमाण ४५ ते ५० लाख इतके आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी मुंबईत पहिले १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय पुणे, भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण राबविण्यात आले आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त तर चार जिल्ह्यात सुमारे ७० टक्के लसीकरण झाले आहेत. जवळपास १६ जिल्ह्यांमध्ये ६० टक्के लसीकरण झाले आहे, तर नंदुरबार आणि बीड जिल्ह्यात केवळ ५७ टक्के लसीकरण झाले आहे.

राज्यात १० कोटी ५९ लाख लसवंत
राज्यात शुक्रवारी ४,९४,५६५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण १० कोटी ५९ लाख ७७ हजार ९९० लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १२,९४,१५१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११,३२,३८६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तर राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ८१ लाख ८० हजार ३७ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ७२ लाख २० हजार ८०४ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४  वयोगटातील ३ कोटी ९० लाख ६७ हजार ४६ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ५० लाख ५७ हजार ६२३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.

राज्यात दहा हजारांवर सक्रिय रुग्णसंख्या 
राज्यात कोरोनाचे २,२७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ६४,७४,९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात शनिवारी ८३३  नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात ९७,६९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १००२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १० हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत.
 

Web Title: The state has received two crore corona vaccines, but two crore beneficiaries are waiting for the first dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.