पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 07:00 AM2019-06-27T07:00:00+5:302019-06-27T07:00:01+5:30
देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील 23 दिवसांची वारी आणि परतीचा 13 दिवसांचा प्रवास याचा विचार करून वारक-यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये साठी आरोग्य विभाग विशेष लक्ष पुरवित आहे...
पुणे : पालखी सोहळ्यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाने वारक-यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित केले आहे. देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावर तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत चोवीस तास बाह्यरूग्ण व मोफत उपचार सुविधा देण्याबरोबरच पालखी मार्गावर प्रत्येक खासगी रूगणालयातील 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.
देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील 23 दिवसांची वारी आणि परतीचा 13 दिवसांचा प्रवास याचा विचार करून वारक-यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये साठी आरोग्य विभाग विशेष लक्ष पुरवित आहे. यासाठी विभागाने सुमारे साडेतीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पालखी व दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तीन व एक दिवस आधी धूर फवारणी केली जात आहे. पालखी सोहळ्यासोबतच प्रत्येकी 3 रूग्णवाहिका तर अत्यावस्थ रूग्णसेवेसाठी 108 च्या 72 रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर असलेल्या हॉटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये हॉटेलमधील पाणी, अन्नपदार्थांची स्वच्छता व निगा यांचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर आरोग्यसेवा पुरविणारी 10 ग्रामीण रूग्णालये व 15 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 9 ग्रामीण रूग्णालये तर 22 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी 595 डॉक्टर, 823 अधिपरिचारिका, 339 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 871 आरोग्यसेवक सज्ज करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी रूग्णांना ने-आण करण्यासाठी 50 दुचाकी रूग्णवाहिका सेवेत तैनात ठेवण्यात आल्या आहेत. एकाचवेळी 100 रूग्ण दाखल करता येतील अशी व्यवस्था उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये सहा खाटांचे अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आले आहेत. मोबाईल प्रथमोपचाराची तीन पथके असून, त्यात तज्ञ अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.