शिक्षणसंस्थांचा शुक्रवारी राज्यव्यापी संप : परीक्षांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:41 PM2018-11-01T20:41:16+5:302018-11-01T20:43:45+5:30
शाळांना शिक्षकेतर अनुदान मिळत मिळावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता द्यावी, शाळांकडून वारंवार किचकट माहिती मागवू नये आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्यावतीने शुक्रवारी (दि. २ नोव्हें) शाळांचा राज्यव्यापी संप पाळला जाणार आहे. शाळांना शिक्षकेतर अनुदान मिळत मिळावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता द्यावी, शाळांकडून वारंवार किचकट माहिती मागवू नये आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. पुणे विभागातील शाळांनी या संपात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात खाजगी शिक्षण संस्थांमार्फत अनेक वर्षे शिक्षण तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु अलीकडच्या काळात शिक्षण संस्था चालकांना अनेक आर्थिक, प्रशासकीय तसचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम करणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा संप पुकारण्यात आल्याचे महामंडळाचे विभागीय अध्यक्ष आप्पासाहेब बालवडकर यांनी सांगितले.
जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांनी खाजगी शिक्षण संस्थाचालकांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेण्याचे लेखी आदेश शिक्षण संचालकांनी काढले होते. मात्र या बैठका घेण्यात आल्या आहेत. शाळांना तुटपुंजे शिक्षणेतर अनुदान दिले जाते. त्याचबरोबर ते अनुदान देतानाही अनेक अडचणी उभ्या केल्या जात आहेत.
शाळांकडून वारंवार अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती शिक्षण विभागाकडून मागविली जाते. गेल्या ५ वर्षात कामाच्या व्यापात १० पटीने वाढ झालेली आहे. दुसरीकडे १५ वर्षांपासून क्लार्क भरती करण्यात आलेली नाही. संगणक आॅपरेटर उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही माहिती पुरविण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांवर मोठया प्रमाणात बोजा पडत आहे. त्याचा परिणाम शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकविण्यावर होत आहे. यामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
शिक्षणसंस्था महामंडळाकडून शुक्रवारी एक दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे, मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शाळांचा बेमुदत बंद पुकारला जाईल असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
................
अनेक शाळांमध्ये सध्या परीक्षा सुरू आहेत, यापार्श्वभुमीवर राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने शुक्रवारी शाळांचा संप पुकारला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम परीक्षांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळांमध्ये शुक्रवारी ठेवलेल्या परीक्षा इतर दिवशी घेण्याचे नियोजन करावे व शुक्रवारी संपात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षणसंस्था महामंडळाने केले आहे. मात्र शाळांच्या नियोजित परीक्षांमुळे शाळांचा संपाला प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता आहे.
..................