मी..मी..करणाऱ्यांचे काय होते, हे राज्याला ठाऊक आहे!

By admin | Published: February 19, 2017 03:26 AM2017-02-19T03:26:51+5:302017-02-19T03:26:51+5:30

ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची

The state knows what happens to me. | मी..मी..करणाऱ्यांचे काय होते, हे राज्याला ठाऊक आहे!

मी..मी..करणाऱ्यांचे काय होते, हे राज्याला ठाऊक आहे!

Next

मुंबई : ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची आपल्याकडे काय अवस्था होते. हे सगळ््यांना माहिती आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी लगावला.
सध्या मुंबईत व राज्यातही अनेक ठिकाणी ‘हा माझा शब्द आहे’ असे विधान मुख्यमंत्र्यांच्या तोंडी टाकून भाजपाने निवडणूक कॅम्पेन केले आहे. त्याची खिल्ली उडवताना पवार म्हणाले, भाजपाचे अनेक खासदार, राज्यातील मंत्री मला खासगीत भेटतात, मोकळेपणाने बोलतात. आमच्या पक्षाला अटलजी, अडवाणी यांच्यासारखे नेते होते, परंतु त्यांनी कधी एककेंद्री नेतृत्व तयार केले नाही. मात्र, हल्ली ‘मी’ पणावर जोर देऊन इतरांना विचारात व विश्वासात न घेण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत ते नेते बोलून दाखवत आहेत. भाजपामधील नेत्यांचा हा ‘मी’ पणा लोकशाहीला घातक आहे. ज्यांना अजून पूर्ण महाराष्ट्रही माहीत नाही, अशा नेत्यांकडून राज्यातील जनतेला ‘हा माझा शब्द आहे’ असे सांगणे हास्यास्पद असल्याचेही पवार म्हणाले.
आपण काय केले ते सांगायचे नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले हे सांगणारे आरोप करत राहायचे, त्यातून एवढा चौफेर हल्ला केल्यावर गप्प बसेल ती शिवसेना कसली? त्यांच्या टीकेला उत्तर म्हणून सेनेचे मंत्रीदेखील आता फडणवीस माजी मुख्यमंत्री होणार, असे म्हणू लागले आहेत! ते माजी झाल्यावर हे कोण राहतील कोणास ठावूक? शिवसेना भाजपाचा पाठिंबा काढून घेणार की नाही माहिती नाही, पण ते पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे पाठिंबा ठेवणार नाही, असे सांगत आहेत. हे ही काही कमी नाही, असेही पवार म्हणाले. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय तटकरे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
नोटाबंदीमुळे ८० लाख
लोक रोजगार हमीच्या दारात!
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. काळा पैसा बाहेर येईल, म्हणून लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, पण त्यातील तथ्य जसे बाहेर येत आहे, तसे लोकांचा सरकार विरोधातील राग वाढत चालला आहे. नोटांबदीच्या निर्णयामुळे देशातील लाखो रोजगार बंद पडले आहेत. मालेगावमधील पॉवरलूम सेक्टरमधून हजारो लोक आपल्या मूळ गावी गेले आहेत.
नोटाबंदीचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसाय व कष्टकरी लोक असणाऱ्या छोट्या व्यवसायावर झाला आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या ग्रामविकास खात्याने माहिती जारी केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेत मागील तीन वर्षांत नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या काळात ३० लाख लोक काम करत होते आणि नोटाबंदीनंतरच्या त्याच तीन महिन्यांत हा आकडा ३० लाखावरून ८० लाख झाला. यावरूनच नोटांबदीचा फटका किती जबरदस्त होता, हे लक्षात येईल असे पवार म्हणाले.
या पारदर्शकतेचे
उत्तर द्यावेच लागेल!
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची किती होर्डिंग्ज लागली हे तुम्ही पाहात आहातच. मात्र, दोन अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाने मुंबईभर आणि सगळ््या राज्यात होर्डिंग्ज आणि जाहिरातबाजी केली. त्यासाठी किती तरी आर्थिक गुंतवणूक केली. हा कोट्यवधींचा निधी कोठून आणला, ही आर्थिक शक्ती कशी काय वाढली, याचे उत्तर पारदर्शकतेची भूमिका उच्चारवात मांडणाऱ्या फडणवीस यांना द्यावेच लागेल, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

शब्द किती पाळतात, हे खडसे सांगतील...
एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, राज्यात आणि केंद्रात आम्ही सत्तेत नसलो, तरीही कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा हे आजही लोकांना कळते. फडणवीस शब्द किती पाळतात, हे एकनाथ खडसे यांना विचारले, तर ते जास्त चांगले सांगू शकतील. कारण त्यांचा त्यातला अनुभव जास्त चांगला आहे, अशी जोरदार फटकेबाजीही पवारांनी केली.

Web Title: The state knows what happens to me.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.