‘लोकमत’ सरपंच अ‍वॉर्डचा बुधवारी मुंबईत होणार राज्यस्तरीय सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 02:34 PM2018-03-25T14:34:44+5:302018-03-25T14:34:44+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला ‘लोकमत सरपंच आॅफ द ईअर’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार याची उत्सुकता २८ मार्च रोजी संपणार आहे. 

The state-level ceremony will be held in Mumbai on Wednesday | ‘लोकमत’ सरपंच अ‍वॉर्डचा बुधवारी मुंबईत होणार राज्यस्तरीय सोहळा

‘लोकमत’ सरपंच अ‍वॉर्डचा बुधवारी मुंबईत होणार राज्यस्तरीय सोहळा

Next

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला ‘लोकमत सरपंच आॅफ द ईअर’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार याची उत्सुकता २८ मार्च रोजी संपणार आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात गावाची शान असलेल्या राज्यातील १३ सरपंचांना ‘लोकमत’च्या पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे.
गावांच्या बदलांसाठी सरपंचांकडून सुरू असलेल्या धडपडीची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सरपंच अ‍वॉर्ड सुरू केले आहेत. सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा राज्यातील व पंचायत राज व्यवस्थेतीलही हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘बीकेटी टायर्स’ हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक असून ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.
पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यातील १८ जिल्ह्यांमधून पुरस्कारांसाठी प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातून प्रत्येक जिल्हास्तरावर आदर्श सरपंचांना गौरविण्यात आले. आता जिल्हास्तरीय विजेत्यांतून राज्यस्तरावरील पुरस्कारार्थींची निवड होणार आहे. नामवंत ज्युरी मंडळ राज्यस्तरीय सरपंचांची निवड करणार आहे. बुधवारी नरिमन पॉइंटवरील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता सोहळा पार पडणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी असतील. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रणजीत पाटील यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ‘लोकमत’च्या एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला रणांगण सिनेमाचा नायक स्वप्निल जोशी व नायिका प्रणाली घोगरे तसेच अभिनेत्री स्पृहा जोशी कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित असतील.
> राज्यभरातील सरपंचांची उपस्थिती
अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या १८ जिल्ह्यांतील सरपंच या पुरस्कार योजनेत सहभागी झाले आहेत. या सरपंचांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी रस्सीखेच आहे. जिल्हास्तरावर विजेत्या ठरलेल्या सर्व सरपंचांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
> १३ पुरस्कारांची होणार घोषणा
जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ विभागांत केलेल्या उल्लेखनीय कामांसाठी राज्यस्तरावर प्रत्येकी एक सरपंच निवडला जाणार आहे. ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाऱ्या सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईअर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कारही दिले जाणार आहेत. पुरस्कारार्थींची घोषणा सोहळ्यात होणार आहे.
>बुधवार : २८ मार्च
यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉइंट, मुंबई
सकाळी ११ वाजता

Web Title: The state-level ceremony will be held in Mumbai on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच