सोलापुरात गुरूवारपासून राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा

By Appasaheb.patil | Published: December 23, 2019 04:53 PM2019-12-23T16:53:00+5:302019-12-23T16:56:32+5:30

सोलापूर विद्यापीठ; राज्यातील २० विद्यापीठांचे २७०० खेळाडू सहभाग नोंदविणार

State Level Inter University Sports Competition in Solapur from Thursday | सोलापुरात गुरूवारपासून राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा

सोलापुरात गुरूवारपासून राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देक्रीडा स्पर्धा यासंदर्भात जागृती निर्माण व्हावी या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यात क्रीडा ज्योतीचे आयोजन२४ डिसेंबरपर्यंत ही क्रीडाज्योत जिल्ह्यातील विविध महाविदयालयांमध्ये जाणारस्पर्धेचा समारोप ३० डिसेंबररोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार

सोलापूर : महामहिम राज्यपाल कार्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठात आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विदयापीठ क्रीडा स्पर्धाना दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी प्रारंभ होत आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गुरूवार २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस असणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.बी. घुटे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस.के. पवार , कुलपती नियुक्त  व्यवस्थापन परिषद सदस्य महेश माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या इतिहासात प्रथमच या राज्यस्तरीय आंतरविदयापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. या भव्य क्रीडा महोत्सवासाठी विदयापीठाने जय्यत तयारी केली आहे, विद्यापीठाच्या परिसराला क्रीडानगरीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या आयोजनासाठी विदयापीठाने १५ मैदाने तयार करून घेतली आहेत. या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २० विदयापीठांचे जवळपास २ हजार ७०० विद्यार्थी व संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. 

या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी ७० विविध समित्या गठित करण्यात आल्या असून त्या समित्यांमार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे. विदयापीठाच्या परिसरात हॉलीबॉलची चार मैदाने, बास्केट बॉलची  दोन मैदाने ,कबड्डीची चार मैदाने, खो-खो ची चार मैदाने, तसेच मैदानी स्पधेर्साठी चा ट्रॅक निर्माण करण्यात आलेला आहे. या पाच स्पर्धा विदयापीठाच्या परिसरात होणार आहेत. या व्यतिरिक्त सहावी स्पर्धा विदयापीठाच्या इच्छेनुसार आयोजित करावयाची असते. यात विदयापीठाने  हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा सिंहगड अभियांत्रिकी महाविदयालयाच्या परिसरातील चार मैदानांवर होणार आहे. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विदयापीठांचे मुला-मुलींचे संघ येणार आहेत. त्यातील बाराशे मुली आणि महिला संघ व्यवस्थापक यांची व्यवस्था सिंहगड महाविदयालय परिसरात करण्यात आली आहे.

विदयापीठाच्या वसतिगृहामध्ये आठशे मुलांची, भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविदयालयाच्या परिसरात चारशे मुलांची निवास व्यवस्था केली आहे. बी.एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविदयालयाच्या परिसरात दोनशे संघ व्यवस्थापकांची व्यवस्था करण्यात आली आहे तर बाळे परिसरातील चुंबळकर बिल्डिंगमध्ये दोनशे पंचांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मराठा मंडळ होस्टेल, आर्किड अभियांत्रिकी महाविदयालय, दयानंद महाविदयालय, देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालय मोहोळ तसेच सोलापूर रेल्वे स्टेशन गेस्ट हाऊस इत्यादी ठिकाणी देखील निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या क्रीडा स्पधेर्साठी येणाºया खेळाडूंच्या वाहन व्यवस्थेसाठी सिंहगड संस्थेने २५ बस ,स्वेरी अभियांत्रिकी महाविदयालय, पंढरपूरने तीन बस तर बी.एम.आय.टी. संस्थेने एक बस असे एकंदर २९ बस दिल्या आहेत. 

या महोत्सवासाठी येणाºया खेळाडू, संघ व्यवस्थापक, इत्यादींची भोजनाची व्यवस्था विद्यापीठाच्या परिसरात करण्यात आली असून त्यासाठी विद्यापीठ निहाय २० स्वतंत्र काउंटर उभारण्यात आले आहेत. याशिवाय अतिथींसाठी दोन स्वतंत्र काउंटर असणार आहेत.
या  क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने येणाºया खेळाडूंसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या ललितकला विभागातर्फे  हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांनी जवळपास १८ लाख रुपये किमतीचे बास्केटबॉल मैदान त्यांच्या संस्थेतर्फे तयार करून दिले आहे. याशिवाय अश्विनी रुग्णालयाच्यावतीने चेअरमन बिपिनभाई पटेल यांनी पाच लाख रुपयाची देणगी देऊन एक हॉलीबॉलचे मैदान तयार करण्यासाठी, बार्शीच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांनी देखील पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालय, मोहोळच्या वतीने देखील ५० हजार रुपयांची देणगी, उदयोगपती प्रकाश शिंदे यांनी ५२ ट्रॉफी देणगी स्वरुपात दिल्या. इतरही काही देणगीदारींनी योगदान देण्याचे जाहीर केले आहे. 

या स्पर्धेसाठी राज्यपाल कार्यलयातर्फे निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात सावित्रीबाई फुले, पुणे विदयापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक माने अध्यक्ष असून संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठाचे क्रीडा संचालक डॉ. अविनाश अणसुरे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांचा समावेश आहे.  

या क्रीडा स्पर्धा यासंदर्भात जागृती निर्माण व्हावी या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यात क्रीडा ज्योतीचे आयोजन केले असून २४ डिसेंबरपर्यंत ही क्रीडाज्योत जिल्ह्यातील विविध महाविदयालयांमध्ये जाणार आहे. या स्पर्धेचा समारोप ३० डिसेंबररोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणी असून क्रीडाप्रेमींनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन विदयापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विकास घुटे आणि क्रीडा संचालक डॉ. एस.के. पवार यांनी केले आहे.

Web Title: State Level Inter University Sports Competition in Solapur from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.