अकोल्यात राज्यस्तरीय जॉइंट अँग्रोस्को
By admin | Published: May 28, 2016 01:55 AM2016-05-28T01:55:12+5:302016-05-28T02:12:22+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन, केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी, कृषिमंत्री खडसे यांचीही उपस्थिती.
अकोला: गत वर्षभरात कृषी विद्यापीठांनी व कृषी, शासकीय विभागांनी केलेल्या विविध विषयांतील संलग्न संशोधनांना व शिफारशींना मान्यता देण्यासाठी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची सभा २८ ते ३0 मे दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होत आहे. या सभेला उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सांसदीय कामकाजमंत्री राजीव प्रताप रू डी, राज्यातील कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथराव खडसे अकोल्यात येणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या सभेत कृषी संशोधकांनी केलेले संशोधन, शिफारशींवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
बदलत्या जागतिक हवामानबदलाच्या पृष्ठभूमीवर राज्यातील शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेतीव्यवसायाला अधिक फायदेशीर आणि बळकट करणे ही काळाची गरज ओळखूनच राज्यातील कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनाच्या दिशा निश्चित केल्या आहेत. उपलब्ध संसाधनांवर आधारित अल्प खर्चाचे एकात्मिक अन्नद्रव्य, पीक संरक्षण तंत्रज्ञान, कृषिमालाचे मूल्यवर्धन, जल व मृद् संधारण यांसह शेतीपूरक व्यवसायातील नवनवीन संधींचा फायदा येणार्या काळात बळीराजाला नवी उमेद देणारा ठरेल. या दिशेने राज्यातील चारही कृषी विद्यापीठे वाटचाल करीत आहेत. त्यासाठी कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची सभा यावर्षी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित केली असून, २८ मे रोजी सकाळी १0 वाजता या सभेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन करतील. अध्यक्षस्थानी कृषिमंत्री एकनाथराव खडसे राहतील.