‘लोकमत’तर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा
By admin | Published: June 21, 2017 02:23 AM2017-06-21T02:23:04+5:302017-06-21T02:23:04+5:30
दैनिक ‘लोकमत’ने प्रतिभाशाली कवींना अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा करण्यासाठी राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या अग्रगण्य दैनिक ‘लोकमत’ने प्रतिभाशाली कवींना अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा करण्यासाठी राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केली आहे.
‘लोकमत’ने समाज, संस्कृती आणि साहित्य हे तिन्ही विषय कायमच केंद्रस्थानी ठेवले आहेत. मराठी साहित्य विश्वात ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’नी मानाचे स्थान मिळविले आहे. आता या काव्यस्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कवींच्या उत्तमोत्तम कविता राज्यभरातील वाचकांपर्यंत घेऊन जाता येतील.
आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे, तर कविता ही लखलखती वीज आहे. तिला समर्थपणे पेलणारे अनेक कवी महाराष्ट्रात आहेत.
सध्या नव्या पिढीतील कवी आशयगर्भ आणि कसदार कविता करीत आहेत. त्यांच्या प्रतिभेला या स्पर्धेच्या निमित्ताने नव्याने व्यक्त व्हायची संधी मिळेल. अशा
दर्जेदार कवींना सर्वदूरच्या वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम माध्यम म्हणून ‘लोकमत’ करणार आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या दुर्गम गावागावांमध्येही कविता करणारे कवी आहेत. अशा सर्वांना एकत्रितपणे सामावून घेण्यासाठी व त्यातून सर्वोत्कृष्ट कवी व त्यांनी केलेल्या सर्वोत्तम कवितांची निवड करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
सहभागी होणाऱ्या कवींमधून परीक्षक मंडळ विजेत्यांची निवड करेल. त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसह ५ उत्तेजनार्थ विजेत्यांचीही निवड केली जाईल.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ५ हजार, द्वितीय क्रमांकास ३ हजार, तृतीय क्रमांकास २ हजार तसेच ५ उत्तेजनार्थ विजेत्यांना १ हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येईल. इच्छुक कवींनी त्यांच्या कविता २५ जून २०१७ पर्यंत kavyarutu@lokmat.comया इ-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. कविता जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवाव्यात.
काव्यस्पर्धेचे नियम व अटी :
दोन स्वरचित कविता पाठवाव्यात.
कविता एकाच फुलस्केप पानावर असावी.
कवितेसाठी विषयाचे बंधन नाही.
कविता पाठविण्याची अंतिम मुदत २५ जून २०१७.
परीक्षकांनी निवडलेल्या कवितांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी ३ बक्षिसे आणि ५ उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील.
यथावकाश योग्य वेळी व योग्य ठिकाणी कविता प्रसिद्ध केली जाईल.
कविता स्कॅन करून न पाठवता पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवाव्यात.