राज्यस्तर विज्ञान प्रदर्शन यंदा देवरूखला
By admin | Published: January 7, 2015 10:19 PM2015-01-07T22:19:56+5:302015-01-07T23:57:36+5:30
कोकणला संधी : माने अभियांत्रिकी विद्यालयाकडे यजमानपद
देवरुख : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मुुंबई, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, शिक्षण विभाग, कोल्हापूर आणि प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव - देवरुख संचलीत कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, साडवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४०वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. १७ ते २१ जानेवारी या कालावधीत राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, राजेंद्र माने तंत्रनिकेतन, आंबव येथे होणार आहे.
यानिमित्त विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान दिंडी सह्याद्रीनगर साडवली ते सावरकर चौक, देवरुखदरम्यान मार्गक्रमण करणार आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा विज्ञानाशी निगडीत वेगवेगळ्या देखाव्यांच्या चित्ररथांसह सहभागी होणार आहेत. प्रदर्शन कालावधीमध्ये तज्ज्ञ विज्ञान प्राध्यापकांची व्याख्याने व परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. ‘आकाश दर्शनाचा’ कार्यक्रमही या विज्ञान प्रदर्शन दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्यभरातून प्राथमिक गट व माध्यमिक गटातील विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक व लोकसंख्या विभाग अशा वेगवेगळ्या गटातून विज्ञानाशी निगडीत ४२६ प्रकल्प मांडण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात एकूण १२०० स्पर्धक सहभागी होणार आहेत.
हे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कोकण विभागामध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर होत असून, त्याच्या आयोजनाचा मान प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव - देवरुख संचलीत कै. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, साडवली यांना मिळाला आहे. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील सर्व विद्यालये, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. (प्रतिनिधी)