राज्यात आता थंडीची चाहूल
By admin | Published: November 2, 2015 02:46 AM2015-11-02T02:46:02+5:302015-11-02T02:46:02+5:30
आॅक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेला तापमान कमी होऊ लागल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील वातावरणही आल्हाददायक झाले असून
मुंबई : आॅक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेला तापमान कमी होऊ लागल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील वातावरणही आल्हाददायक झाले असून, शहराच्या किमान तापमानाचा पारा २१ अंशावर घसरला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य अरबी समुद्राच्या भागावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ वायव्य दिशेला सरकत आहे. गेल्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ५ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २३ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामानात होत असलेले हे प्राथमिक बदल कालांतराने थंडीची तीव्रता आणखी वाढविण्याची शक्यता असून, तापमानातील ही घसरण कडाक्याची थंडीची चाहूल देणारी आहे. (प्रतिनिधी)