राज्यातील परिचारिका होणार ‘अपग्रेड’
By admin | Published: May 31, 2016 06:13 AM2016-05-31T06:13:11+5:302016-05-31T06:13:11+5:30
आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना भविष्यात चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने घेतला आहे.
मुंबई : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना भविष्यात चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने घेतला आहे. कौन्सिलच्या ५०व्या वर्षात राज्यातील २ लाख परिचारिका आणि शिकाऊ परिचारिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या हेल्थ करिअर्स इंटरनॅशनलशी सामंजस्य करार केला आहे.
परदेशात शुश्रूषा क्षेत्रात परिचारिकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक परिचारिका देशात शिक्षण पूर्ण केल्यावर परदेशात नोकरीसाठी जातात. परिचारिकांना मिळणारे वेतन अत्यल्प असल्याने परिचारिका परदेशात जाण्याचा मार्ग स्वीकारतात. पण, यापुढे परिचारिका क्षेत्रातील संधीविषयी जनजागृती व्हावी. परिचारिकांची कौशल्ये वाढल्यास त्या चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देऊ शकतात. त्यामुळे वेतनात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे परिचारिकांना ‘स्पेशल’ विषयांत प्रशिक्षण दिल्यास त्या योग्य प्रकारे रुग्णांची सेवा स्वतंत्रपणे करू शकतात, असे मत कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी यांनी मांडले.
डॉ. माळी यांनी पुढे सांगितले, आॅस्ट्रेलियातील हेल्थ करिअर्स इंटरनॅशनलशी करार केल्यामुळे राज्यातील परिचारिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. ४ वर्षांच्या करारात राज्यातील २ लाख परिचारिकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणावेळी त्या विभागातील दोन शिक्षक आणि हेल्थ करिअर्सचा एक शिक्षक असणार आहे. त्यामुळे त्या भागातील परिचारिकांना भाषेचा अडसर येणार नाही. सध्या परिचारिकांची संख्या कमी आहे. पण, पुढच्या काळात परिचारिका क्षेत्रातील संधी समोर आल्याने परिचारिकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान असणाऱ्या परिचारिकांमुळे रुग्णसेवेचा दर्जाही उंचावेल, असे मत हेल्थ करिअर इंडिया इंटरनॅशनलायझेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ. अरुण जामकर यांनी मांडले. (प्रतिनिधी)